जळगाव । जिल्हा कलाध्यापक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, जिल्हाध्यक्षपदी एन.ओ.चौधरी यांची तर सचिवपदी अरुण सपकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रविवारी शहरातील नंदिनीबाई मुलींचे विद्यालय येथे कलाध्यापक संघाची सहविचार सभा पार पडली या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी कलाध्यापक संघाचे राज्य सरचिटणीस एस.डी.भिरुड, ग.स.सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम बोरोले, प्रा.सुनील गरुड आदी उपस्थित होते. बैठकीत कलाध्यापक संघाच्या शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच विविध समस्यांचे निरसन करण्यासाठी राज्य शासनाकडे निवेदन देण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
तासिकांबाबत न्याय मागणार
कार्यानुभव, चित्रकला व इतर कला विषयांच्या तासिका कमी केल्याप्रकरणी गेल्या महिन्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदन दिले आहे. या निवेदनावर सरकार सध्या विचार करत असल्याची माहिती राज्य सरचिटणीस एस.डी.भिरुड यांनी दिली. शासनाने कलाध्यापकांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावे यासाठी शासनाशी वेळोवेळी निवेदने देण्यात आल्यात, चर्चा करण्यात आले आहेत मात्र शासन दखल घेत नसल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारीणी अशी
जिल्हाध्यक्ष एन.ओ.चौधरी, सचिवपदी अरुण सपकाळे,उपकार्याध्यक्षपदी आर.डी.चौधरी, उपाध्यक्षपदी दिनेश बाविस्कर, कोषाध्यक्ष दामू चौधरी, अजय पाटील, सचिवपदी अरुण सपकाळे, विभागीय उपाध्यक्ष नितीन सोनवणे, अर्जून सोळंके, निलेश कुमावत, संदीप पाटील, वसंत नागपुरे यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारीणींला निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आले.
विद्यालयाला आले यात्रेचे स्वरुप
नंदीनीबाई बेंडाळे मुलींच्या विद्यालयात कलाध्यापक संघाची सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती तसेच विद्यालयाजवळ असलेल्या लेवा बोर्डीग सभागृहात माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. दोन्ही सभेसाठी मोठी उपस्थिती असल्याची संधी साधत विक्रेत्यांनी वस्तूंच्या विक्रीसाठी दुकाने लावलेली होती. खाद्य वस्तूंसह विविध जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी दुकाने लावलेल्या होत्या. त्यामुळे विद्यालय परिसराला यात्रेचे स्वरुप आलेले होते.