तळेगाव दाभाडे : कै.डॉ.शं.वा.परांजपे आणि गो.नी.दांडेकर यांच्या प्रेरणेने 1977 साली सुरू झालेल्या आणि जगाच्या पटलावर तळेगाव दाभाडेचे नाव कोरणार्या कलापिनी संस्थेच्या 40व्या वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. कलापिनीच्या सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या सोहळ्यात कलापिनीच्या स्थापनेपासून असलेल्या ज्येष्ठ कलाकर आणि कार्यकर्त्यांचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच सुप्रसिद्ध नाट्य, सिने अभिनेते, दिग्दर्शक, लेखक योगेश सोमण संचालित दहा दिवसीय शिबिराचा समारोप आणि शिबिरार्थींचे सादरीकरण असा दुहेरी कार्यक्रम आयोजित केला होता.
चांगल्या कलाकृतीना प्रोत्साहन द्या
सोहळ्याचा प्रारंभ ‘रंगदेवते तुज अभिवादन’ या कलापिनीच्या युवा कलाकारांनी गायलेल्या नांदीने झाली. अनघा बुरसे यांनी योगेश सोमण यांच्या कथेचे सुंदर सादरीकरण केले. कलेच्या माध्यमातून सतत व्यक्त होत राहिले पाहिजे, कलाकारांनी आशयसंपन्न आणि दर्जेदार कलाकृतींचा ध्यास घेतला पाहिजे. रसिकांनी चांगल्या कलाकृतीना प्रोत्साहन दिले पाहिजे त्याच प्रमाणे त्रुटीही आवर्जून सांगितल्या पाहिजे , असे मनोगत योगेश सोमण यांनी व्यक्त केले.
या झाला सन्मान
बाळासाहेब गद्रे, प्रकाशराव जोशी, भरत शुक्ल, अशोक संभूस, हेमंत सिधये, बापू महाजनी, विलास एरंडे, भारती शहा, अभय लिमये, रवींद्र टोळे, श्रीपाद उंडे, प्रल्हाद मालकर, सुजाता जोशी, विश्वास देशपांडे, किरण परळीकर, प्रमोद शुक्ल या ज्येष्ठ रंगकर्मींचा गौरव कलापिनीच्या बाल आणि युवा पिढीच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन श्रीपाद बुरसे, विराज सवाई, विशाखा बेके, विनायक काळे, प्रतीक मेहता, प्रसाद वायकर, हृतिक पाटील, अंजली सहस्त्रबुद्धे, अनघा बुरसे, प्रदीप जोशी, अशोक बकरे यांनी केले. कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.