कलामांच्या हातात संविधान दिलं नाही म्हणून काय झालं?

0

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं त्यांच्या जन्मगावी रामेश्‍वरम (तामीळनाडू) इथं स्मारक उभारण्यात आलं. कालच्या 27 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं. जवळपास 15 कोटी रुपये खर्चून हे स्मारक साकारण्यात आलं. हे स्मारक भव्य करण्याचा प्रयत्न तर झालाच, पण दिव्य व्हावं यासाठीही डोकंही लावण्यात आलं. स्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर वीणाधारी कलाम, त्यांच्यापुढं ‘भगवद्गीता’ असं चित्र दिसलं. फक्त ‘गीता’ का? ‘कुराण’ आणि ‘बायबल’ही ठेवा, अशी मागणी पुढे आली. मग ‘कुराण’, ‘बायबल’ ठेवलं गेलं. फक्त ‘गीता’ ठेवण्याच्या प्रकरणावर खुद्द कलामांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली होती. तामीळनाडूतील संघ परिवाराच्या संस्थांनी ‘कुराण’, ‘बायबल’ नको, फक्त ‘गीता’च ठेवा’ यासाठी आग्रह धरला होता. द्रविडी विचाराच्या संघटना मात्र वेगळाच आग्रह धरून या स्मारकावर नाराजी व्यक्त करत आहेत. यात द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाच्या विविध गटांचा समावेश आहे. या गटात वाइको या तामीळ नेत्याचे अनुयायी आहेत.या द्रविडी विचाराच्या गटाचं म्हणणं असं की, कलाम हे गीतेऐवजी प्रसिद्ध तामीळ लेखक तिरुवल्लुवर यांच्या वचनांना (कवितांना) महत्त्व देत. या कवितांना ‘तिरुवल्ली’ म्हणतात.

द्रविड विरुद्ध वैदिकी असा वाद तामीळनाडूला नवा नाही. पेरियार रामास्वामी नायकर यांनी द्रविडी आंदोलन सुरू केलं, तेव्हापासून हा वाद अधूनमधून पेट घेत आला आहे. मात्र, त्याची मुळं खूप जुनी आहेत. या वादाला वांशिक, भाषिक मुळं आहेत. तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडचा आणि कावेरी नदीच्या आसमंताचा भूप्रदेश म्हणजे तामीळनाडू. इथं मूळ द्राविडी संस्कृती होती. ती फार प्राचीन आहे. तामीळ भाषेचा शब्दसंग्रह स्वतंत्र व विपुल आहे. स्वतंत्र भाषा, स्वतंत्र शब्दकोश, स्वतंत्र वाक्यरचना, तिचा सारा संसार स्वयंभू आहे. संस्कृतपेक्षा जुना आहे. तामीळनाडूमधला ‘नाड’ हा शब्द ‘देश’ या अर्थानं वापरला जातो. ‘देश’ या संस्कृत शब्दाचा तो पर्यायी शब्द. म्हणजे तामीळनाडू या शब्दातच स्वतंत्र देश असा भावार्थ आहे. तामीळ भाषेत पाच महाकाव्ये आहेत. त्यांचं सार ‘कुरल’मध्ये येतं. हा नीतीशास्त्रावरचा ग्रंथ आहे. तामिळींची अस्मिता असलेला हा ग्रंथ कलामांच्या प्रतिकृतीजवळ नाही याचा निषेध द्रविडींनी केला आहे. हे जाणूनबुजून करण्यात आलंय, असा त्यांचा आरोप आहे. तामिळी भाषेला डावलण्याचा हा कावा असल्याचं द्रविडींना वाटतं. आधीच द्रविडींचा संस्कृत, हिंदी या भाषांना असलेला विरोध जगजाहीर आहे. या भाषा हातात घेऊन उत्तरेचे राजकारणी तामिळी संस्कृतीवर आक्रमण करतात, असा आरोप करत पेरियार यांनी एकेकाळी स्वतंत्र तामीळ देशाची मागणीही केली होती. त्या आंदोलनात मोठा हिंसाचारही झाला होता.

आता या वादात तामीळ दलित संघटनांनीही उडी घेतली. त्यांनी मागणी केलीय की, अब्दुल कलाम हे थोर शास्त्रज्ञ होते. राष्ट्रपती होते. कोळी या मागास जातीतून ते पुढे आले. देशाचे महान पुरुष ठरले. भारताच्या संविधानाचा हा मोठा विजय आहे. कलामांचे जीवन म्हणजे संविधानाची फलश्रुती मानता येईल. म्हणून कलामांच्या हातात वीणेऐवजी संविधान जास्त शोभले असते. वीणेऐवजी कलामांच्या हातात संविधान द्यावे, या मागणीवर दलित संघटना ठाम आहेत. प्रतीकांची पळवापळवी, विकृतीकरण, हवं तसं सादरीकरण हा फार मोठ्या सांस्कृतिक राजकारणाचा भाग असतो.

आपल्याला जो विचार सांगायचाय, समाजात रुजवायचाय तो प्रतीकांच्या माध्यमातून नेणं, रुजवणं हे एक प्रभावी राजकारण असतं. संघ परिवार या राजकारणात सतत अग्रेसर असतो. त्या राजकारणाचा भाग म्हणूनच म. गांधी, पं. नेहरू यांचं विकृतीकरण होत जातं. अकबर हरला, राणा प्रताप जिंकला हे त्यातूनच बिंबवण्यात येतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड त्यातूनच होत राहते. दीनदयाळ उपाध्याय म्हणूनच पुढे येत आहेत. पण प्रतीकांच्या विकृतीकरणाचा खेळ खपवून घेतला जाईलच असं नव्हे. प्रतीकं, भाषा, वंश, जात, वर्ण, धर्म, प्रांत भेदामुळे आपल्या देशात खूप खदखद आहे.
राजा कांदळकर – 9987121300