कलावंत विद्यार्थ्यांनाही दहावीत ग्रेस मार्क!

0

जळगाव (विकास पाटील) : गायन, वादन, नृत्य शिक्षणात प्रावीण्य मिळविणारे आणि लोककलेच्या शिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत सवलतीचे वाढीव गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यंदाच्या परीक्षेपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विशेष म्हणजे, ही वाढीव सवलतीच्या गुणांची योजना राज्यभर तत्काळ अंमलात येणार आहे. मार्च 2017 मध्ये 10वीची परीक्षा देणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार असून, राज्यभरातून 48 संस्थांची निवड सरकारने केलेली आहे. या 48 संस्थांमध्ये विविध कला प्रकारांचे शिक्षण घेणारे गुणी विद्यार्थी सवलतीच्या वाढीव गुणांसाठी पात्र ठरतील, असे सांस्कृतिक कार्य खात्याच्या 1 मार्चरोजी जारी झालेल्या शासन निर्णय क्र. संकीर्ण 8217/प्र.क्र.41/सां.का.4 या परिपत्रकात नमूद केलेे आहे.

गायन, वादन व नृत्यक्षेत्रातील 19 संस्था
गायन, वादन व नृत्यक्षेत्रातील राज्यातल्या 19 संस्थांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यात जळगावच्या मोहन नगरातील संगीत ज्ञानपीठाचा समावेश आहे. पुणे, ठाणे, बीड, उस्मानाबाद, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर याच भागातील या 19 संस्था असून, त्यात विदर्भातील एकाही संस्थेचा समावेश नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. विदर्भातील विद्यार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचा सरकाराचा हेतू असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

2010 सालातला प्रस्ताव
या योजनेचा प्रस्ताव शालेय शिक्षण व क्रीडा खात्याने मार्च 2010 मध्ये तयार केला होता. हा प्रस्ताव तेव्हापासून सांस्कृतिक कार्य खात्याच्या विचाराधीन होता. शास्त्रीय कला म्हणजे गायन, वादन, नृत्य, चित्रकला या क्षेत्रात प्रावीण्य मिळविणारे आणि लोककला प्रकारांच्या शिक्षणात सहभागी झालेले विद्यार्थी वाढीव सवलतीच्या गुणांना पात्र ठरणार आहे. खेळाडूंप्रमाणे कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही वाढीव सवलतीचे गुण मिळणार असल्याने पालक समाधान व्यक्त करीत आहे. राज्य सरकारचे उपसचिव एस. पी. भोकरे यांच्या सहीने जारी झालेल्या या परिपत्रकात संस्थांच्या पात्रतेसाठीचेही नियम नमूद केलेले आहे. या संस्थांनी शिफारस केलेले विद्यार्थी वाढीव सवलतीच्या गुणांना पात्र ठरतील.

लोककला प्रकारांमध्ये 29 संस्था
विविध लोककलांचे शिक्षण देणार्‍या राज्यातील 29 संस्थांची निवड करण्यात आली असून, शाहिरी, लावणी, भारुड, गोंधळ, पोवाडे, नारदीय कीर्तन आदी लोककला प्रकारांचा यात समावेश आहे. या 29 संस्थांपैकी विदर्भातील फक्त तीन संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यात अमरावतीच्या दोन व अकोल्यातील एका संस्थेचा समावेश आहे. विदर्भातील संस्थांचा या योजनेत अपेक्षेप्रमाणे विचार न झाल्याने हा सरकारी अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. गोंधळ पोवाडे व भारुडाचे प्रशिक्षण देणारी भडगाव तालुक्यातील पिंपळगावची राष्ट्रीय महापुरुष फुले, शाहू, डॉ. आंबेडकर बहुउद्देशिय संस्था व इतर लोककलांचे प्रशिक्षण देणारे जळगावचे श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाला मान्यता मिळालेली आहे.