फैजपूरच धनाजी नाना पाटील महाविद्यालय सध्या अक्षरश: युवकांच्या नवोन्मेषाने फुलून गेलाय. एरवी नुसत्या कॉलेजच्या मुलांनी भरलेला हा परिसर आज खान्देशातील विविध भागांतून आलेल्या तरुणाईच्या उपस्थितीने गजबजून गेला आहे. शुक्रवारी रात्रीच पोहोचलेले संघ सराव आणि प्रवासाने थकून आलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी सकाळी उठून नटून-थटून उदघाटन कार्यक्रमासाठी पोहोचण्याची लगबग. सेल्फी पॉईंटवर झालेली सेल्फीसाठीची गर्दी, उदघाटनाच्या कार्यक्रमात सत्काराच्या औपचारिकतेपासून वाजणार्या प्रत्येक संगीताच्या धूनवर वर हात करून झुमणारे हजारो हात, प्रत्येक शेरोशायरीवर पडणार्या टाळ्या, प्रत्येक खुमासदार वक्तव्यावर हास्याचे फवारे हे सगळंच अगदीच अफाट. तरुणाईचा जल्लोष दाखविणारे चित्र.
आदिवासी बहुल विद्यार्थी असलेल्या खान्देशच्या भूमीपुत्रांच्या वेगवेगळ्या कलाकृती पाहताना येणारा रोमांच, त्यांच्या कला सादरीकरणात अफाट ऊर्जा आणि यातूनच घडणारे कलाकार. तरुणाईची ही अफाट ऊर्जा फैजपुरातल्या सहा रंगमंचावर ओसंडून वाहताना दिसत आहे. प्रत्येक रंगमंचासमोर उपस्थित दर्शक तरुणाई देखील तितकीच मोठ्या प्रमाणात दाद देतेय. आपल्या महाविद्यालयाच्या संघाला सपोर्ट करणारे फॅन्स. मुख्य रंगमंच क्रमांक एक अतिशय उत्तम पद्धतीने सजविलेला. त्याच्या दर्शनी भागात ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका ऐतिहासिक ठिकाणी आपण आहात’ अशी भली मोठी सूचना प्रत्येक तरुणाला फैजपुरच्या इतिहासाची आठवण करून देत होती. कुसुमताई मधुकरराव चौधरी यांच्या नावाने हा रंगमंच असून त्यावर मधुकरराव चौधरी यांच्या व्यक्तिमत्वाच्या छटा उमटलेल्या दिसत आहेत. उदघाटनानंतर याच रंगमंचावर स्कीट अर्थात विडंबन नाट्यातून हास्याचे फवारे उडविले गेले. यात स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी, आजचे भ्रष्ट राजकारण, भ्रष्टाचार, छेडखानी, बलात्कार, सोशल मीडिया, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, शिक्षणपद्धती अशा विषयांवर विविधांगी विषयांवर अतिशय खुमासदार शैलीत या तरुणाईने सिस्टमचे दोषच प्रेक्षकांसमोर ठेवले.‘शकुंतलाताई जीवराम महाजन’ या रंगमंच क्रमांक दोनवर भारतीय लोकसंगीतातील तमाम छटा सुरेल व सुरेख पद्धतीने प्रस्तुत केले गेले. यावेळी वाजणार्या ढोलकी, ढोल, हलगीच्या तालावर उपस्थितांना थिरकायला देखील लावले. यात महाराष्ट्राची लोककला लावणी, अभंग, गवळणी, आदिवासी गीते प्रस्तुत केली गेली. तिसरा रंगमंच ‘सौ.शामलाताई गुणवंतराव सरोदे’. इथं खरतर फोटोग्राफीचा इव्हेंट असल्यानं शुकशुकाट होता. परिसरात आपल्याला दिलेले विषय घेऊन बेस्ट क्लिक साठी भावी फोटोग्राफर क्लिकत असलेले दिसून येत होते. चौथ्या ’ कै. सिंधूताई पार्थ चौधरी’ रंगमंचावर शास्त्रीय वादनाचा अफाट सोहळा अनुभवायला मिळाला. सुरवाद्याने सुरांच्या विविध छटा तर तालवाद्यात वेगवेगळ्या वाद्यांची अनुभूती अनुभवायला मिळत आहे.
‘सौ.सुमनताई चुडामन पाटील रंगमंच’ काव्यांच्या अफाट झर्याने समृद्ध होऊन गेला. वेगवेगळ्या सामाजिक विषयावर भाष्य करणार हि तरुणाई काव्याच्या माध्यमातून अविष्कार करत होती. ग्रामीण भाषाशैलीतील काव्यप्रस्तुतींनी खरोखर अंतर्मुख व्हायला भाग पाडले. काही युवकांच्या कवितांच्या सादरीकरणाने टाळ्यांचा कडकडाट थांबायला तयार नव्हता. सहावा व शेवटचा ‘कै. रमाताई देशपांडे रंगमंच’. यात एक गोष्ट जी खूपच विशेष मानली जाते ती म्हणजे सर्व रंगमंचांना महिलांची दिलेली नावे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे अतिशय उत्तम उदाहरण मानले जात आहे. बाकी आज दिवसभरात विडंबन नाट्यासाठी अफाट गर्दी होती. दिवसभरात खान्देशच्या दूरदराज क्षेत्रांतून आलेल्या विद्यार्थ्यांना आयोजकांनी दिलेल्या अप्रतिम भोजनाने खुश करून टाकले. सक्काळी इथं पोचल्यापासून जागोजागी सेल्फी पॉईंट बनल्याचे चित्र आहे. संदीप पाठकच्या भोवती सेल्फीसाठी गराडा घालणारी ही तरुणाई हळूहळू रंगमंचावरून आपले सादरीकरण करून आलेल्या कलाकारांसोबत देख सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत होते. अर्थात रंगमंचाच्या स्पर्शाने प्रत्येक कलाकाराला सेलिब्रेटी होण्याचा मान मिळतोय. उद्या शनिवार आणि रविवार हा रोमांच कायम असणार आहे. स्पर्धेच्या निकालाची चर्चा मात्र स्पर्धा सुरू होण्याच्या आधीपासूनच परिसरात होताना दिसतेय. बाकी जाता-जाता धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरचे उत्तम आयोजनासाठी कौतुक करावे लागेल.
-निलेश झालटे
9822721292