प्राचार्य डॉ. मोहन वामन यांचे प्रतिपादन
पिंपरी-चिंचवड : प्रत्येक विद्यार्थ्याने कलेची जोपासना केली पाहिजे. कला ही आपल्याला जीवन जगण्यास प्रेरणा देते. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. विद्यार्थी भारत देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींविषयी विचार केला पाहिजे. असा विचार करण्याची क्षमता कलेमुळे निर्माण होत असते, असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी केले. महाविद्यालयात आयोजित कला मंडळ उद्घाटन समारंभात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. मोहन वामन, कला शाखाप्रमुख प्रा. मीनाक्षी गोणारकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. मनोहर जाधव, कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर सावंत, प्रा. मुकेश तिवारी, डॉ. विजय गाडे, प्रा. गणेश फुंदे, प्रा. भागवत देसले, प्रा. मच्छिंद्र किर्तने, प्रा. पल्लवी सुबंध आदी मान्यवर उपस्थित होते.
मनातील न्यूनगंड दूर करा
कला शाखाप्रमुख प्रा. मीनाक्षी गोणारकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कला कोणतीही असो; ती जीवन जगण्याच्या क्षमता विकसित करून मानवी जीवन समृद्ध बनवते. त्यामुळेच प्रत्येक महाविद्यालय हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीकोणातून सदैव प्रयत्नशील असते. म्हणूनच महाविद्यालयात विविध स्पर्धांचे तसेच उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे त्या म्हणाल्या. या समारंभास उद्घाटक म्हणून लाभलेले डॉ. मनोहर जाधव यांनी मार्गदर्शन करताना, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कोणती ना कोणती क्षमता असतेच. मात्र, ती स्वतःला ओळखता आली पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक विद्याशाखा ही महत्त्वाची असून, विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला काढला पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद बोडखे यांनी तर आभार प्रा. मीनल भोसले यांनी मानले.