कला, क्रीडा तासिकेत होणार वाढ

0

भुसावळ । कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका 1 तास वाढविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शाळांमधील इयत्तानिहाय विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली तर शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत. तसेच याविषयांचे शिक्षक निवृत्त झाल्यानंतर ते पद कमी होणार नाही यांची काळजी घेण्यात येईल यादृष्टीने शासन पातळीवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री तावडे यांनी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले. त्याचप्रमाणे महासंघाच्या अन्य मागण्यांसंदर्भात 21 ऑगस्टनंतर सविस्तर चर्चा करण्यात येईल व मागण्यांचा सकारात्मक विचार करु असे आश्वासन तावडे यांनी शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आमंत्रित केले होते. शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून करण्यात आलेल्या विषयावर तासिका विभागणी कला, क्रीडा व कायार्नुभव विषयासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नासंदर्भात तावडे यांनी महासंघाच्या पदाधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा केली.

निवृत्त शिक्षकांच्या जागेवर नियुक्ती होणार
या जागेवर शारीरिक शिक्षण शिक्षकाचीच नियुक्ती करण्यात येईल. शालेय वेळापत्रकाशिवाय शारिरीक शिक्षण शिक्षक सकाळ संध्याकाळी घेत असलेला सराव, स्पर्धेला टीम घेऊन जाणे या वेळेचा वर्कलोडमध्ये समावेश करण्यात येईल. नियमांबाबतही कायदेशीर विचार करून निर्णय घेतला जाईल. 20 तेे 25 ऑगस्ट दरम्यान रोजी महासंघबरोबर पुन्हा एकदा बैठक घेण्याचे मंत्री यांनी ठरविले आहे. या सर्व बाबींची कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षणमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. या बैठकीला शिक्षणमंत्री विनोद तावडे, पुणे विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, कापडणीस, उपसचिव डॉ.सुवर्णा खरात, क्रीडा उपसंचालक मोटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळामध्ये महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, निमंत्रक विजय बहाळकर, शालिग्राम भिरुड, प्रदीप साखरे, विश्वनाथ पाटोळे, सुरेश मुळूक, मिलिंद क्षीरसागर, चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर कानडे, डॉ. ओमप्रकाश जोशी, अनिल आदमाने, जे.बी.मदने, जितेंद्र पवार, महेंद्र भोसले, मनोहर यादव, मारोती माने, राजेंद्र भारंबे, सुनिल ठाणेकर, आर वाय जाधव, अंकुश आहीर यांच्यासह सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

वेळापत्रकात तीन तासिका देणार
सुमारे दीड तास चाललेल्या या चर्चेमध्ये महासंघाच्या विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. शारीरिक शिक्षण या विषयासाठी वेळापत्रकात तीन तासिका देण्यात येतील. कार्यभार कमी हे कारण देऊन शारीरिक शिक्षण शिक्षकांना अतिरिक्त करता येणार नाही. शारीरिक शिक्षण शिक्षक निवृत्त झाल्यानंतर या विषयाचे पद कायम राहील.

बहिष्कार तूर्त स्थगित
शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्यामुळे रेखाकला परीक्षा व शासनाच्या कला परीक्षा व क्रीडा शिक्षकांनी स्पर्धांवर जो बहिष्कार टाकला होता तो तूर्त स्थगित घेण्यात आला आहे. तसेच शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य न केल्यास कला, क्रिडा शिक्षक संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा क्रीडा व शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रदीप साखरे व कला अध्यापक संघाचे अध्यक्ष व जिल्हा निमंत्रक एस.डी. भिरुड यांनी सांगितली.