कला, क्रीडा व संस्कृतीने नटलेला ‘मावळ फेस्टिव्हल’ शुक्रवारपासून रंगणार

0
खेळ रंगला पैठणीचा, फनफेअर, गोपूजन, विनोदी नाटक व धुमधडाका 2018 अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन
नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांनी दिली माहिती
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील कला, क्रीडा आणि संस्कृती या कलेचा ठेवा असलेला वडगाव मावळ येथील ‘मावळ फेस्टिव्हल’ हा दिमाखदार सोहळा दि.28 ते दि.30 डिसेंबर 2018 पर्यंत होणार आहे. त्यामध्ये खेळ रंगला पैठणीचा, फनफेअर, गोपूजन, विनोदी नाटक व धुमधडाका 2018 अशा विविध कार्यक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व वडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक प्रवीण तथा राजेंद्र चव्हाण, नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र कुडे, कार्यक्रम प्रमुख पत्रकार बाळासाहेब भालेकर यांनी दिली.
वडगाव मावळचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात होणार असलेल्या या फेस्टिव्हलचा शुभारंभ शुक्रवार दि 28 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ रंगला पैठणीचा  या कार्यक्रमाने होणार असून विजेत्यांसाठी मानाची पैठणी, सोन्याची नथ व चांदीचा छल्ला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती आणि मुलांसाठी फनफेअर हे विशेष आकर्षण असणार आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
शनिवार, 29 डिसेंबर रोजी मावळ फेस्टिव्हल सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण व मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे यांना संस्थेच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार तर गडभटकंती दुर्ग संवर्धन संस्थेला दुर्गसंवर्धन पुरस्कार देण्यात येणार आहे. उद्घाटन प्रसंगी गोपूजन केले जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता सिनेअभिनेते भरत जाधव व अभिनेत्री ऋजुता देशमुख यांची भूमिका असलेले वन्स मोअर हे कॉमेडी नाटक होणार आहे. रविवार दि 30 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अविनाश धस यांच्या स्वामी विवेकानंद ग्रुपची योग प्रात्यक्षिके व त्यानंतर मनोरंजनाच्या कार्यक्रमात सिनेअभिनेत्री श्रुती मराठे हिचा सहभाग असलेला धुमधडाका 2018 मराठी- हिंदी व नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाने सांगता होईल.
नागरिकांना उपस्थित रहाण्याचे आवाहन
हा दिमाखदार सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे संयोजन सभापती गुलाब म्हाळसकर, अरूण वाघमारे, नामदेव ढोरे, भूषण मुथा, बंडोपंत धर्माधिकारी, शैलेश ढोरे, रवींद्र काकडे, प्रमोद म्हाळसकर, किरण म्हाळसकर, नितीन कुडे, श्याम ढोरे, सलिम तांबोळी, सुनीत कदम, सुरेश जांभुळकर, सागर जाधव, दत्तात्रय लंके, महेंद्र म्हाळसकर, विनायक भेगडे, शंकर भोंडवे, पवन भंडारी, ओंकार ढोरे हे मान्यवर करीत आहेत.