कलेला प्रोत्साहन करणारा महोत्सव

0

मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची दीडशे वर्षांची परंपरा आहे. पूर्वी संगीत नाटकांचे प्रयोग रात्र सरली तरी संपत नसत. काळ बदलत गेला आणि संगीत नाटकांचं अस्तित्वच धोक्यात आले. गडकरी, खाडिलकर, देवल यांनी संगीताने मंत्रमुग्ध करणारी नाटके दिली ज्याला नाट्यसंगीतप्रेमींनी भरभरून पाठिंबा दिला. नंतर संगीत नाटकांना आलेल्या मरगळीला विद्याधर गोखले, शिरवाडकर, कानिटकर यांनी झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु, कालानुरूप बदललेल्या मानसिकतेत गद्य नाटकांच्या स्पर्धेत संगीत नाटके कोमेजून गेली. आजच्या पिढीपर्यंत ही संगीत नाटके पोहोचली पाहिजेत व त्यांना त्याच्यातील गोडी वाढली पाहिजे, या उद्देशाने दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र गेली 9 वर्षे अशा प्रकारच्या संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन करते. यंदादेखील हा महोत्सव उत्साहात पार पडला. पण यंदाची गर्दी व विशेषतः त्यात नव्या पिढीचा सहभाग हा लक्षणीय होता. त्यामुळेच या संगीत नाटकांच्या भवितव्याबाबत नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केवळ साठीच्या पुढचे लोकच संगीत नाटकांना येतात, हे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने आयोजित केलेल्या संगीत नाट्यमहोत्सवाने खोटे ठरवले.

या महोत्सवात पहिल्या दिवशी गंधर्वभूषण जयराम शिलेदार नाट्यसेवा ट्रस्ट निर्मित व दीप्ती भोगले दिग्दर्शित वि. वा. शिरवाडकर लिखित संगीत ययाती आणि देवयानी या नाटकाच्या प्रयोगात चिन्मय जोगळेकर, निनाद जाधव, भक्ती पागे, श्रद्धा सबनीस यांच्या मुख्य भूमिका होत्या. दुसर्‍या दिवशी मुंबई मराठी साहित्य संघ निर्मिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संगीत संन्यस्त खड्ग या नाटकाचा प्रयोग सादर केला. संपदा माने, अमोल बावडेकर यांच्या प्रमुख भूमिका तर प्रमोद पवार यांचे दिग्दर्शन होते. संगीत गीता गाता ज्ञानेश्‍वर हे नानासाहेब शिरगोपीकर यांचे नाटक तिसर्‍या दिवशी कल्याणच्या श्री आर्यादुर्गा क्रिएशन्सने सादर केले. सुनील जोशी दिग्दर्शित या नाटकात सुनील जोशी, अनघा देशपांडे, रश्मी सुळे आणि अभय करंदीकर यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. संगीत, अभिनय आणि निर्मिती मूल्यं दर्जेदार असलेल्या या नाटकांना रसिकांची मिळालेली उत्सफूर्त दाद ही यशाची पावती होती. यापूर्वी झालेल्या संगीत नाटक महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहता हा उत्साहव विशेष होता. संगीत नाटक काळानुरुप बदललेलं आहे. संगीत रंगभूमी ही काळानुसार नेहमीच बदलत आलेली आहे. परंतु आता संगीत रंगभूमीचा वेगळ्या प्रकारे विचार व्हायला हवा. नवे लेखक, नवे दिग्दर्शक, नव्या प्रकारचं संगीत आता संगीत नाटकांसाठी आवश्यक आहे. काळानुसार जुन्या संगीत नाटके संपादित स्वरूपात सादरी केली गेली पाहिजेत. त्यातील गाण्यांनाही यथायोग्य कात्री लावून ती आटोपशीर करायला हवीत. त्याचबरोबर संगीत नाटकांकडे नव्या पिढीला आकृष्ट करण्यासाठी त्यांची रुची लक्षात घेऊन त्यानुरूप नव्या आशय-विषयांची नाटके लिहिली जायला हवीत आणि आधुनिक संवेदना असलेल्या नाट्यकर्मीकडून ती सादर व्हायला हवीत. मात्र, हे करत असताना लोकानुयन की अभिरुचीवृद्धी, याचे तारतम्य बाळगायला हवे.

-राजीव श्रीखंडे,
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, मुंबई.