कलेसाठी पोषक वातावरण करणे ही शिक्षकाची जबाबदारी

0

पुणे । कला ही उपजत असावी लागते. एखाद्या व्यक्तीमध्ये दडलेली कला ओळखावी लागते आणि ती बाहेर काढावी लागते. कलेची आवड असल्यास त्यामध्ये जीव ओतून मेहनत घेतली तर नक्कीच यश मिळते. शालेय जीवनात कलेसाठी पोषक वातावरण तयार करणे, ही शिक्षकाची जबाबदारी असते. कलेसाठी काम करीत असताना प्रसिद्धीच्या मागे न लागता आपल्या कलेतून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा, असे मत कलोपासक कलाशिक्षक अजय पराड यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित पोवाडा प्रशिक्षण वर्ग आणि स्वरयात्री माजी रमणबाग विद्यार्थ्यांच्यावतीने पराड यांच्या सेवानिवृत्तीबद्दल गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पराड यांना शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शाहीर गणेशदादा टोकेकर यांनी संगमरवरात बनविलेले सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कलेमुळे दु:खांचा विसर
पराड म्हणाले, कलेमध्ये माणसाला दु:ख विसरण्याची ताकद मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात कला हे असे माध्यम आहे जे माणसाला दु:ख, चिंता विसरायला मदत करते. कलेमुळे त्याला असलेल्या दु:खांचा विसर पडतो आणि तो आनंदी राहू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:मध्ये असलेल्या कलेला जागृत ठेवले पाहिजे.