भुसावळ । कल्चरल सेंटर फॉर रिर्सोसेस अँड ट्रेनिंग (सीसीआरटी) द्वारा तेलंगाणा राज्यात नुकत्याच राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या प्रशिक्षणात राज्यातील शिक्षकांनी ‘रोल ऑफ स्कुल इन कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल अँड कल्चरल हेरिटेज’ या विषयावर सादर केलेल्या प्रकल्पाला उत्कृष्ट प्रकल्पाचा बहुमान मिळाला आहे. हैदराबाद (तेलंगाणा) च्या मधापूर रोड येथील कल्चरल सेंटर फॉर रिर्सोसेस अँड ट्रेनिंग (सीसीआरटी) च्या विभागीय केंद्रावर 17 ते 27 एप्रील दरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणासाठी 100 शिक्षकांची निवड
प्रशिक्षणात प्रत्येक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व त्यासाठी एका क्लबची स्थापना करणे अशा सूचना करण्यात आल्या शिवाय भारतातील विविध परंपरांचे संवर्धन व जतन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थानसह देशातील 100 शिक्षकांची निवड करण्यात आली होती.
राज्यातील नऊ शिक्षकांचा समावेश
यात राज्यातील चमुत नरेंद्र महाले (सरस्वती विदयामंदीर यावल), तन्वी चव्हाण (रायगड), नारायण शिंदे व सुनिल पूरी (रत्नागिरी), मीरा टेके (औरंगाबाद), सरस्वती मुळे (यवतमाळ),शाम स्वामी (हिंगोली), डिगंबर मौर्य व प्रशांत सानप (सिंधुदुर्ग) या नऊ शिक्षकांचा समावेश होता. नरेंद्र महालेंच्या नेतृत्वात राज्यातील शिक्षकांनी ‘गौड जनजाती के त्यौहार’ हा प्रकल्प सादर केला. राज्यातील शिक्षकांनी सादर केलेल्या प्रकल्पाला उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र कल्चरल सेंटर फॉर रिर्सोसेस अँड ट्रेनिंग (सीसीआरटी) हैदराबाद (तेलंगाणा) च्या संचालिका डॉ. लिपीका मैत्रा व सेवानिवृत्त सनदी अधिकारी कृष्णा अय्यर यांच्या हस्ते नरेंद्र महालेंना देण्यात आले.