भुसावळ । दिगंबर जैन मंदिरात वात्सल्य रत्नाकर स्वात्मानंदी महाराज यांच्या सान्निध्यात तसेच प्रतिष्ठाचार्य पं. संजय सरस यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्पद्रुम महामंडळ विधान सोहळा घेण्यात आला. याचा समारोप सोमवार 6 रोजी करण्यात आला. यानिमित्त सांगतेच्या दिवशी 20 घोडे, एक हत्ती, दोन घोडाबग्गी यावर मिरवणूक काढण्यात आली. यात ढोलताशे व झांजपथक असल्यामुळे या मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.
इंद्र-इंद्रायणींमार्फत होमहवन
यामध्ये विधानदिवशी 70 इंद्र-इंद्रायणींमार्फत होमहवन करण्यात आले. या विधानामध्ये समवशरणाची रचना प्रेक्षणिय होती. या रचनेमध्ये गणधर म्हणून 108 स्वात्मनंदी महाराज विराजमान होते. तसेच समवशरणातील प्रश्नोत्तरीदेखील सुंदर होती. यानंतर शहरातून प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. यात समाजातील तीन हजार महिला व पुरुष भाविकांचा सहभाग होता. यावेळी भगवान महावीर स्वामींच्या अहिंसेच्या संदेशाचे नारे देण्यात आले. संचालक सतिश साखरे, खजिनदार रमेश अन्नदाते, सचिव मनिष सैतवाल, दिपक काठे, गजेंद्र रुईकर यांनी परिश्रम घेतले.