कल्पनाबाई बागुल शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित

0

पिंपळनेर । शेवगे ता.साक्री येथील कल्पनाबाई साहेबराव बागुल यांना सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उत्पादन वाढीकरिता केलेल्या प्रशंसनीय कार्याप्रित्यर्थ आदिवासी गटातून ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी 2014 पुरस्कार’ नुकताच राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात देऊन सत्कार व गौरव करण्यात आला. यावेळी कल्पनाबाईंचे सुपुत्र विजय बागुल हेही उपस्थित होते.

कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य
शेतात डाळींब, आंबा, नारळ फळ पिक तसेच भाजीपाला व मसाला पिके तसेच व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान स्थापित केले आहे. कृषी विभागामार्फत 44 बाय 44 मीटर क्षमतेचे शेततळे बांधून घेतले आहे. शेतात ठिबक सिंचन, विक्रमी उत्पादन, सेंद्रिय खत वापर, पशुपालन, कुक्कुटपालन केले आहे. या कार्याबद्दलच सन 2014 मधील कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कल्पनाबाई बागुल यांचा सत्कार राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कृषी व फलोत्पादन मंत्री पांडूरंग फुंडकर, पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्यासह कालदरचे सरपंच विजय पवार व शेवगेचे ग्रा.पं.सदस्य रामदास पडवाळ उपस्थित होते. विजय पवार यांना उत्कृष्ट शेती करीत असल्याबद्दल जि.प.धुळेकडून कृषी योगदान पुरस्कार मिळाला आहे.