कल्पना टॉकीज परिसरात युवकाची आत्महत्या

तळोदा। येथील कल्पना टॉकीज परिसरातील २७ वर्षीय युवकाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी, ५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. ही वार्ता शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर असे, तळोदा येथील कल्पना टॉकीज परिसरातील पाटील कुटुंबीय लग्नात गेल्याचा अंदाज घेऊन योगेश नारायण पाटील या २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःला संपविल्याची घटना घडली. योगेश पाटील यास जन्मतः तोंडावर व अंगावर काळ्या रंगाचे चट्टे होते. परिणामी त्या आजाराला कंटाळून त्याला नैराश्य आले होते. त्यामुळे त्याने घरातील लोखंडी खांबाला दोरखंडाच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तपास पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिलीप साळवे करीत आहे.