इंदिरा महाविद्यालयातील परिषदेत 27 संशोधकांचा सहभाग…
पिंपरी चिंचवड : ‘ई-बिझनेस क्षेत्रातील उदयोन्मुख प्रवाह, सद्यस्थिती व आव्हाने‘ या विषयावर ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाअंतर्गत पहिली राष्ट्रीय परिषद कल्पसमिक्षा पार पडली. या परिषदेत उत्साहपूर्ण विंवेचन करण्यात आले. राज्याबाहेरील व राज्यातील संशोधकांनी या परिषदेत सहभाग नोंदविला. परिषदेचे उद्घाटन एमआयटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुनील राय यांच्या शुभहस्ते झाले. या दरम्यान इंदिरा समूहाचे समूहसंचालक प्रा. चेतन वाकळकर, प्रभारी प्राचार्य डॉ. जनार्दन पवार उपस्थित होते. परिषदेत 20 संशोधन पेपर सादर करण्यात आले. तर राज्यभरातून 27 संशोधकांनी सहभाग नोंदविला.
ई बिझनेसमधील घडामोडींवर प्रकाशझोत…
हे देखील वाचा
डॉ. सुनील राय यांनी वाणिज्य क्षेत्रातील घडामोडी आणि माहिती तंत्रज्ञानाचे या क्षेत्रातील महत्व विषद केले. प्रा. चेतन वाकळकर यांनी बीटकॉईन, क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन मॅनेजमेंट इत्यादिच्या गरजा व महत्व यावरती सखोल मार्गदर्शन केले. डॉ. जनार्दन पवार यांनी राष्ट्रीय परिषदेचा हेतू स्पष्ट केला. परिषदेमध्ये संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. सागर कोंडेकर (संचालक, सामाजिक शास्त्र विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ), डॉ. आर. गणेशन संचालक (अलाना इन्सिस्टयुट, पुणे) हे लाभले. डॉ. कोंडेकर यांनी ‘ई-बिझनेस’ ही संकल्पना अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून शास्त्रोक्त पध्दतीने मांडली. तर डॉ. गणेशन यांनी ई बिझनेसमधील नावीन्यपूर्ण घडामोडी यांवरती प्रकाशझोत टाकला.
डॉ. रमा वेंकटचलम यांना प्रथम पारितोषिक…
प्रथम पारितोषिक डॉ. रमा वेंकटचलम आणि डॉ. गीता राजन यांच्या शोधनिबंधास तर व्दितीय प्रा. दिपक उंबरकर यांना मिळाले. सदरील राष्ट्रीय परिषदेचा समारोप प्रा.डॉ. संजय कप्तान, माजी वाणिज्य विभागप्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या समारोपीय भाषणाने करण्यात आला. संशोधन परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. जर्नादन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. नालंदा वाणी, प्रा. डॉ. सोनाली श्रोत्री, प्रा. विनीता श्रीवास्तव, प्रा. अभिजीत चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. तरिता शंकर, संस्थापक इंदिरा समूह यांनी राष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.