गुन्हा दाखल करण्यास पोलिसाचा नकार ; नशिराबादमध्ये उपचार
भुसावळ : ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील कॉन्स्टेबल असलेल्या विनोद मूलचंद पवार या कर्मचार्यावर भुसावळच्या बसस्थानकात अज्ञातांनी चाकूहल्ला केल्याची घटना 9 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, हा हल्ला का व कुणी केला? याबाबतचे कारण गुलदस्त्यात असून पोलिसाने तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती नशिराबादच्या पोलीस सूत्रांनी दिली. एका गर्दूल्याने हल्ला केल्याचे हा कर्मचारी सांगत असून आपली तक्रार देण्याची मनस्थिती नसल्याचे त्याने नशिराबाद पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
हल्ल्याबाबत संभ्रम
पवार हे मूळचे राहणारे खादगाव डवरीचे असून ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय अंतर्गत असलेल्या ठाण्यात कार्यरत आहेत. लग्नासाठी ते काल जामनेरला आले होते. भुसावळात ते बसने उतरल्यानंतर त्यांच्यावर अज्ञातांनी चाकूने हल्ला चढवला. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णवाहिकेतून बाजारपेठ पोलीस स्टेशनला व तेथून गोदावरीत हलवण्यात आले.