मुंबई : कल्याण पूर्वेकडील परिसरात विहिरीमधील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या तीन तरुणांसह त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही हृदयद्रावक घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.
कल्याण मधील नेतिवली परिसरातील विहिरीत साचलेला गाळ काढण्यासाठी एक तरूण विहिरीत उतरला. बराच वेळ तो बाहेर न आल्यानं त्याला वाचवण्यासाठी दोन तरूण विहिरीत उतरले. तेही गाळात अडकले. त्यांना वाचवण्यासाठी नंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागले. अग्निशमन दलाचे प्रमोद वाकचोरे आणि अनंत शेलार हे दोन कर्मचारी विहिरीत उतरले. मात्र तेही बाहेर न आल्यानं पाचजणही बुडाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी गर्दी जमा झाली. अग्निशमन दलाच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यात एका कर्मचाऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.