कल्याणमध्ये स्वरांजलीतून जागवल्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मृती

0

कल्याण । कल्याणचा सुभेदारवाडा कट्टा आणि रमलखूण यांच्या संयुक्त विद्यमाने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी रविवारी स्वरांजली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य पं. रघुनंदन पणशीकर आणि त्यांच्या सहकारी कलाकारांनी हा बहारदार कार्यक्रम सादर केला. गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर म्हणजे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे जणू काही विद्यापीठच आहे. राग सादरीकरणामागची तात्विक बैठक अत्यंत समृद्धपणे रसिकांसमोर विषद करण्याचे किशोरी आमोणकर यांचे योगदान खूपच मोठे आहे. आपल्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये किशोरी आमोणकर यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना केल्या. विविध प्रयोग त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. अगदी बंदिशीपासून ते सुगम गायकी, चित्रपट संगीत, भावगीत, भक्ती-संगीत, गजल अशा विविध प्रांतात त्यांनी दर्जेदार मुशाफिरी केली.

स्वरांजली या कार्यक्रमात किशोरी आमोणकर यांनी संगीतबद्ध केलेल्या पण फारशा प्रचलित नसलेल्या विविध रचनांचे पं. रघुनंदन पणशीकर यांनी सादरीकरण केले. सुरुवातीला भूप मधली सहेला रे, आ मिल गाये, सप्तसुरन के भेद सुनाये, ही अत्यंत गाजलेली रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर गुरू नानक साहेबांची पंजाबी ठेक्यातील गाणे, मीराबाईंचे मेरे तो गिरीधर गोपाला, काही निवडक उर्दू गजल, शांता शेळके यांचे शब्द असलेले ह्रुदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेले जाईन विचारीत रानफुला हे भावगीत, राघवेंद्र स्वामींचे कन्नड भजन, बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल हा सुप्रसिद्ध अभंग त्यांनी पेश केला. मैफिलीची सांगता त्या अवघा रंग एक झाला या अजरामर भैरवीने झाली. त्यांना अनय इनामदार, भरत कामत, नागेश भोसेकर, इत्यादींची सुरेल साथ लाभली. कार्यक्रमाला रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता.

कार्यक्रमातून प्लास्टिकविरुद्ध जनजागृती
यावेळी प्लास्टिक विषयावर जनजागृती देखील करण्यात आली. त्यासाठी जनजागृतीपर पोस्टर्स यावेळी वितरित करण्यात आली. ही पोस्टर्स नागरिकांवर आपापली गृहसंकुले, कार्यालये आणि आपल्या परिसरातील लहान मोठी दुकानांमध्ये लावण्याचे आवाहनही करण्यात आले. त्याबरोबर आरोग्य दिनानिमित्त कल्याणातील प्रख्यात डॉ. सुरेश फडके यांचा सत्कार करण्यात आला.