कल्याण । खान्देशच्या मातीने जे मला भरभरून दान दिले आहे. त्यामुळे मी तिचा सदैव ऋणी राहीन. खान्देशाच्या आणि खान्देशी माणसांवरील प्रेमापोटी मी या महोत्सवाला उपस्थित राहिल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कल्याण येथील खान्देश फेस्टिव्हलच्या समारोपप्रसंगी बोलताना केले. यावेळी खान्देश भवनाच्या निर्मितीची संयोजकांनी मांडलेली कल्पना उचलून महाजन यांनी कल्याण शहरात खान्देश भवन होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे आश्वासनही दिले. याप्रसंगी चाळीसगावचे आ. उन्मेश पाटील, आ. नरेंद्र पवार, आ. गणपत गायकवाड, नगरसेवक प्रकाश पेणकर, सचिन पोटे व मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील आदींसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम आपले मनोगत व्यक्त करताना हा मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी कल्याण शहरात खान्देश भवन व्हावे ही उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या सदस्यांची इच्छा असल्याचे जाहीर केले. तोच धागा पकडून ना. महाजन यांनी कल्याणमध्ये खान्देश भवनाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी येथील स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांनीही शहरात खान्देश भवन व्हावे यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. संयोजकांनी प्रकाशित केलेल्या अनाजधुन या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा व अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांना खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आ. नरेंद्र पवार, मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील उपस्थित होते. आपल्यावर येणारी संकटे झेलायला आपण शिकले पाहिजे. ही संकटेच आपल्याला मोठी करतात, असे प्रतिपादन अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांनी यावेळी केले. त्यापुढे म्हणाल्या की, ज्यावेळी माझ्या नवर्याने मला घरातून बाहेर काढले तेव्हा मी रडत होते. माझ्यावर आभाळ कोसळले होते, पण मी स्वत:ला सावरले आयुष्यात आलेल्या सर्व संकटांशी धैर्याने तोंड दिले. अनाथ-गरजूंना आधार दिला. एके काळी मी रडले होते. पुढे ज्यावेळी माझा पहिल्यांदा सत्कार झाला तो पाहून माझा नवरा रडत होता, असे सांगत सिंधुताईनी आपल्या जीवनातील संघर्ष उपस्थितांसमोर कथन केला.
नाळ तुटू देऊ नका
यावेळी आ. पाटील यांनी आपल्या भाषणात, खान्देशी माणसाने यशाचे शिखर गाठावे, मोठे व्हावे, परदेशी जावे, प्रगती करावी. परंतु, आपल्या खान्देशी मातीशी आपली नाळ तुटू देऊ नये, असे आवाहन उपस्थितांना केले. या फेस्टिव्हलमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे बहारदार आयोजन तीनही दिवशी करण्यात आले होते. त्यात लहानथोर सर्वांनाच सहभागी होण्याची संधी देण्यात येत होती. सजावटीच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेले खान्देशाचे वैभव तसेच सामाजिक-सांस्कृतिक परंपरा उपस्थितांना जळगावच्या मातीचा अनुभव देत होते.
खान्देश फेस्टिव्हलमध्ये तीन दिवसांत दीड कोटींची उलाढाल
खान्देशातील खाद्यसंस्कृती, उद्योग, कला व पर्यटन समाजातील अन्य घटकांच्या अधिक जवळ नेण्यासाठी कल्याणमधील उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या वतीने तीन दिवसीय खान्देश फेस्टिव्हल शहरात आयोजन करण्यात आले होते. रविवारी फेस्टिव्हलचा अखेरचा दिवस होता. खान्देशी मातीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच तेथील समाज, संस्कृती, खाद्यपदार्थ, वेशभूषा, राजकारण, कर्तृत्ववान स्त्री-पुरुष, पर्यटन स्थळे यांची ओळख समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी शेवटच्या दिवशी या फेस्टिव्हलमध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात दिसत होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई व परिसरातील लाखो नागरिकांनी फेस्टिव्हलला भेट दिली. फेस्टिव्हलमधून असंख्य गृहोपयोगी व इतर वस्तूंची खरेदी केली गेली. खान्देशातील चविष्ट खाद्यपदार्थ हे या फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण ठरले. फेस्टिव्हलला भेट देणार्या लाखो लोकांनी या खाद्यपदार्थांची लज्ज्जत लुटत होते. त्यातही पुरणपोळी आणि आमरस, वांग्याचे भरीत आणि भाकरीवर खवय्यांनी मनसोक्त ताव मारला. दरम्यान, या तीन दिवसांत सुमारे दीड कोटींची उलाढाल या खान्देश फेस्टिव्हलच्या माध्यमातून झाल्याची माहिती फेस्टिव्हलच्या संयोजकांनी दिली.