कल्याण । अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग केला इतकेच नव्हे तर या प्रकाराचा जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या आईला ही मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरात घडला. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार मानपाडा पोलीस ठाण्यात विकी दुबे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी कल्याण पूर्वेकडील पिसवली परिसरात राहते. शनिवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही मुलगी आदर्श नगरहून पिसवलीच्या दिशेने परतत होती. यावेळी याच परिसरात राहणारा विकी दुबे या तरुणाने तिचा पाठलाग सुरू करत तिला हटकले. त्यानंतर तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तेथून काढता पाय घेतला. मात्र विकीने तिचा पाठलाग करत तिचे घर गाठले. घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने आईला सांगितले. तिने विकीला गाठत जाब विचारला. मात्र विकीने तिला देखील शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस तपास करीत आहे.