कल्याणात रेल्वेच्या अर्धवट पुलावर होणार आंदोलन

0

कल्याण : शहाड-आंबिवलीदरम्यान रेल्वेच्या 47 नंबर गेटजवळ नागरिकाच्या सोयीसाठी आठ वर्षांपूर्वी हाती घेतलेले उड्डाणपूल बांधण्याचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून अनेकदा मागणी करूनही हे काम पूर्ण झाले नसल्याच्या निषेधार्थ प्राणवायू संघटनेने 26 आणि 27 जुलै रोजी या अर्धवट पुलावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कल्याण आणि टिटवाळा, खडवली जोंडणारा रस्ता रेल्वे ट्रकमधून जात असून मोहने गेटवर वाहनचालकांना फाटक उघडण्याची प्रतीक्षा करत तासनतास थांबावे लागते. अनेकदा या फाटकातून जीव धोक्यात घालून जाणार्‍या वाहन चालकांना जीव गमवावा लागतो किंवा अपघाताला सामोरे जावे लागते. यामुळेच या रेल्वे ट्रकवरून उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करत 6 वर्षापूर्वी या पुलाचे पालिका प्रशासनाकडून भूमिपूजन करण्यात आले. मात्र तेव्हापासून आजपर्यत हे काम अर्धवटच अवस्थेत असून रेल्वे ट्रकवरून जाणार्‍या पुलाचे काम रेल्वे प्रशासनाने पूर्ण केले असले तरी दोन्ही बाजूना जोडणार्‍या या पुलाचे काम पिलरपर्यतच अडकले आहे. या पुलासाठी जमीन हसतातरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच या पुलाचे काम घाईगडबडीत मंजूर करत यासाठी ठेकेदार नेमण्यात आला असून हे पूल केव्हा पूर्ण होणार याकडे वाहनचालकासह खडवली मोहने परिसरात राहणार्‍या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रिक्षा संघटनाही सहभागी
मोहने पुलाचे संथगतीने सुरु असलेल्या कामाचा वेग वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी विविध संघटनांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे केली असली तरी या पुलाचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. त्यानंतर सुरु झालेली एफ केबिनसह अनेक उड्डाणपुलावरून वाहतूक सुरु झालेली असताना याच पुलासाठी पालिका प्रशासनाची उदासीन भूमिका का? असा प्रश्‍न त्रस्त नागरिक विचारत असताना पालिका प्रशासनाकडून त्यांना ठोस उत्तर मिळत नसल्यामुळे रहिवासी त्रस्त आहेत. यामुळेच याचा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी प्राणवायू संघटनेबरोबरच रिक्षा संघटनेनेदेखील 26 आणि 27 जुलै रोजी या अर्धवट पुलावर आंदोलन छेडत प्रशासनाचा निषेध करण्याचा इशारा दिला आहे.

हस्तातंरीत प्रक्रियेमुळे पूल रखडला
याबाबत पालिका प्रशासनाला विचारले असता या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या बिल्डरच्या जमिनी बाधित होत असून त्याच्याकडून जमिनी हस्तातंरीत करण्यास अडचणी येत असल्यामुळे हा पूल रखडला आहे. मात्र जमिनी ताब्यात नसताना अर्धवट पुलाचा घाट प्रशासनाने कोणाच्या फायद्यासाठी घातला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.