कल्याणी फोर्जच्या लेखापालाची विष पिऊन आत्महत्या

0

चाकण : कल्याणी फोर्जमध्ये वरिष्ठ लेखापाल म्हणून काम करणार्‍या नीलेश गायकवाड (वय 32, रा. कोंढवा, पुणे) यांनी चाकण येथील गंधर्व हॉटेलमध्ये विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी गायकवाड यांनी 10 पानी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये कल्याणी फोर्जचे मालक अमित कल्याणी यांना सर्वस्वी जबाबदार धरले आहे. त्यानुसार, प्राथमिक तपासाअंती अमित कल्याणी यांच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक व्यवहारातून घडला प्रकार
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश गायकवाड हे मुंढवा येथील कल्याणी फोर्ज कंपनीत वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत होते. गायकवाड यांनी कल्याणी यांच्यासाठी एकाकडून 15 कोटी रुपये घेतले होते. मात्र, कल्याणी यांनी केवळ 11 कोटी 40 लाख रुपये परत दिले होते. तसेच, गायकवाड यांचे 60 लाख रुपयांचे कमिशनही कल्याणी यांनी त्यांना दिले नव्हते. त्यामुळे ज्यांचे 15 कोटी गायकवाड यांनी घेतले होते. त्यांनी गायकवाड यांच्यामागे पैशांसाठी ससेमिरा लावला होता. मात्र, कल्याणी यांनी प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे गायकवाड यांनी नैराश्य व दबावातून विष पिऊन आत्महत्या केली, असे सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

17 ऑगस्टला बुक केली खोली
नीलेश गायकवाड हे 17 ऑगस्टपासूनच चाकण येथील गंधर्व हॉटेल येथे राहण्यास आले होते. मात्र, त्यांनी घरी कोणतीच कल्पना दिली नव्हती. त्यामुळे घरच्यांनीही गायकवाड बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली होती. त्यांनी 17 ऑगस्टला खोली बुक केली. मात्र, गेले दोन दिवस रुमचा दरवाचा उघडला गेला नाही. म्हणून हॉटेल प्रशासनाने पोलिसांना कळवले असता सर्व प्रकार उघडकीस आला. मृतदेह पाहता आत्महत्या दोन दिवसांपूर्वीच झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.