कल्याण ग्रोथ सेंटरला तत्त्वतः मंजुरी, जागेच्या किमती तीन पटीने वाढणार

0

ठाणे । कल्याण ग्रोथ सेंटरला आज तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. इथल्या पायाभूत सोयी सुविधांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद
करण्यात आलीय. उद्योगाकरिता मुंबईवर अवलंबून असलेल्यांना आता दुसरा पर्याय तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी कल्याण ग्रोथ सेंटरचे कार्य कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल तसेच स्थानिक लोकांचा फायदा व्हावा यासाठी त्यांना विकासात भागिदार बनवून घेण्यात येईल, स्थानिकांनी संयुक्त मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कल्याण ग्रोथ सेंटर विकसित करताना बांद्रा कुर्ला संकुलाच्या धर्तीवर आधी कल्याण येथे रस्ते व इतर पायाभूत सुविधा उभारण्यात येतील, स्थानिकांनी सहकार्य केल्यास त्याबाबतची जागा निश्‍चिती करण्यात येईल. यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एम एम आर डी ए)मार्फत सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे निश्‍चित वेळेत हे काम पुर्ण करणे शक्य होणार आहे. ज्या दिवशी रस्ते तयार होतील त्या दिवशी तिथल्या जमिनीच्या किंमती तीन पटीने वाढणार आहेत, आणि भविष्यात दहा पट वाढ निश्‍चित होणार आहे. त्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे.बांद्रा कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याण ग्रोथ सेंटरचा विकास करण्यात येणार असून स्थानिकांच्या मागण्यांना न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, संघर्ष समितीचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, मु. म. प्र. वि. प्राधिकरणचे महानगर आयुक्त यु पी एस मदान, अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांची मागणी असलेल्या 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास प्रत्येक भूखंडधारक भूमिपुत्रासोबत करार करण्याची आणि वेळेत काम पूर्ण करण्याची शासनाची तयारी आहे. भू संपादनाच्या कायद्यात आता बदल झाले आहेत. यात शासनाची जबाबदारी वाढली आहे. राज्य शासनाने विविध विकास योजनांसाठी गेल्या तीन वर्षात जेवढे भू संपादन केले ते स्थानिकांच्या संमतीने केले आहे. लोकांना यात आपला फायदा दिसला तर लोक स्वतःहून सहभागी होतात. आपल्या येणार्‍या पिढीसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणारा आहे. त्याच्यासाठी सोयी सुविधा आणि रोजगार निर्माण करणारा आहे. या परिसरात असलेल्या इतर प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष भूमिपुत्रांना लाभ मिळालेला नाही, मात्र आता या योजनेतून शंभर टक्के फायदा हा स्थानिक भूमिपुत्रांना होईल. या प्रकल्पासाठी लागणारी पायाभूत सुविधांची उभारणी ही तीन ते चार वर्षात पूर्ण होईल आणि येत्या सात-आठ वर्षात प्रत्यक्ष गुंतवणूक यायला सुरुवात होइल. प्रकल्प सुरु करण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे, आपल्या सूचनांवर सकारात्मक विचार करुन पारदर्शकपणे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासनही यावेळी दिले.

काय आहे कल्याण ग्रोथ सेंटर
मुख्यमंत्री यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या यादीत समाविष्ट असलेला प्रकल्प. जमिनीचे एकत्रीकरण करून स्थानिकांना प्रकल्पात भागिदारी. अर्थव्यवस्थेला उत्तेजन मिळेल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. एकात्मिक संकुले तयार करणार. ग्रोथ सेंटरमध्ये असलेल्या जमिनींच्या मालकांना किमान 50 टक्केपर्यंत विकसित प्लॉट्स. रहिवास, वाणिज्य व इतर इमारती बांधता येतील. टी. डी. आर. व अतिरिक्त चटई क्षेत्राची सोय.