कल्याण-ठाकुर्ली जवळ रेल्वे रुळाला तडे

0

कल्याण : कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्या मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे मुंबईकडे येणार्‍या जलद गाड्या धीम्या मार्गावर मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. मात्र एका तासानंतर मध्य रेल्वे मार्गावरील लोकलची जलद वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. तर यादरम्यान जलद मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावर वळवली. असे असले तरी प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. तर शुक्रवारी अक्षयतृतिया असल्याने अनेक लोक खरेदी निमित्त बाहेर पडले होते. मात्र रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे लोकांना तारेवरची कसरत करतच रेल्वेतून प्रवास करावा लागला.

शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणार्‍या जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. सकाळी साडेआठच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली. ऐन कार्यालय गाठण्याच्यावेळेत मध्य रेल्वे कोलमडल्याने लाखो नोकरदार प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक पूर्ववत झाली तरी, लोकल काही मिनिटे उशिराने धावत होत्या. महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारच्या दिवशी प्रवाशांना पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. तर कर्जत, कसार्‍याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. ऐन कामावर जाण्याच्या वेळी आणि गर्दीवेळी हा खोळंबा झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या सततच्या विस्कळीत होण्यावर, तांत्रिक बिघाडावर प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आली.