कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीचा अर्धा खर्च केंद्र उचलणार

0

ठाणे : कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्पातील 50 टक्के वाटा उचलण्यास केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली. या प्रकल्पाच्या व्यवहार्यता तसेच प्राथमिक सविस्तर प्रकल्प अहवालाचे सादरीकरण सोमवारी गडकरी यांच्यासमोर करण्यात आले. त्यावेळी गडकरी यांनी ठाणे महानगरपालिकेला प्रकल्पाचा अंतिम सविस्तर अहवाल बनवण्याचे निर्देश दिले. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे खासदार राजन विचारे, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते.

453 कोटींचा खर्च अपेक्षित
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई-मीरा भाईंदर हा जलमार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी 453 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याअंतर्गत कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, काल्हेर, कोलशेत, नागला बंदर, घोडबंदर रोड, मीरा भाईंदर, वसई किल्ला या ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. तर नितीन गडकरी यांनी ठाणे महापालिकेला अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे निर्देश देताना प्रकल्पातील खर्चाचा 50 टक्के वाटा उचलण्यास मान्यता दिल्याने हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्यास आणखी बळ मिळाले आहे.

लवकरच अँफिबियस बस मिळणार
हायब्रिड टेक्नॉलॉजीवर आधारित पाणी आणि रस्त्यावरही चालू शकणारी अँफिबियस बस या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यासही गडकरी यांनी दाखवली आहे. लवकरच ठाणे महापालिकेच्या ताब्यात ही बस येणार असून सध्या उपलब्ध असलेल्या जेट्टींच्या आधारे वाहतूकही सुरू करता येणार असल्याचे सांगण्यात आले. कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक सुरू होण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी खा. डॉ. शिंदे आणि राजन विचारे यांचा दिल्लीत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.