कल्याण। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा उचलण्यातील खेळखंडोब्याला कारणीभूत ठरलेल्या कचरावाहू वाहनांच्या दुरुस्तीमधील सावळा गोंधळ सत्ताधारी शिवसेनेच्या सभागृहनेत्यांनी उघडकीस आणला आहे. पालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील वाहनदुरुस्ती आगाराला सेनेच्या पदाधिकार्यांनी दिलेल्या अचानक भेटीत तेथे अधिकारी-कर्मचार्यांची अनुपस्थिती, दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कचरावाहू वाहने, वाहनांच्या नोंदी नसणे असे प्रकार आढळून आले. विशेष म्हणजे एक रुग्णवाहिका तब्बल 20 दिवस दुरुस्ती अभावी तेथे उभी असल्याचा गंभीर व तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे कल्याण-डोंबिवली शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचाच प्रकार संबंधित जबाबदार अधिकार्यांकडून सुरू असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली शहरात वेळेवर कचरा उचलला जात नसल्याची ओरड सुरू होती. कल्याणमध्येदेखील तशीच परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. आधारवाडी भरावभूमीवर कचरा टाकण्यासाठी जाणार्या वाहनांना तेथपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अडचण होत होती. त्यातच अनेक कचरावाहू वाहने नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे सभागृह नेते तथा डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी खंबाळपाडा येथील वाहनदुरुस्ती आगाराला भेट दिली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे हेही होते. तेथे त्यांना अनेक कचरावाहू वाहने त्यातील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत उभी असल्याचे आढळले. तेथे अधिकारी वा कर्मचारी गैरहजर असल्याची धक्कादायक बाब दिसून आली.
दुरुस्तीसाठी येणार्या व परत जाणार्या वाहनांची आगारातील नोंदवहीत योग्य प्रकारे नोंद न होणे, वाहनचालक चावी जमा न करता स्वत:बरोबर नेत असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. मोरे यांनी कनिष्ठ अभियंता संजय आव्हाड यांना बोलावून घेतले व या प्रकाराबाबत विचारणा केली. त्यांच्याकडील खासगी वहीत काही वाहनांची नोंद आढळून आली. मोरे यांच्या वाहनदुरुस्ती आगाराला भेट देण्यातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. राजेश मोरे यांनी यासंदर्भात संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. या सर्व प्रकाराला महापालिका प्रशासनाचे यंत्रणेवर नियंत्रण नसणे कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, महापालिकेच्या भोंगळ कारभाराला महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा कनिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांवर कोणताही अंकुश नसल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुशील आरके यांनी व्यक्त केली आहे, अशाच संतप्त प्रतिक्रिया कल्याण-डोंबिवलीकर नागरिक व्यक्त करत आहेत.
अत्यावश्यक सेवेची रुग्णवाहिका 20 दिवसांपासून उभी
डोंबिवली येथील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील एक रुग्णवाहिका येथे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत तब्बल 20 दिवसांपासून उभी असल्याचा धक्कादायक प्रकार मोरे यांच्या नजरेत आला. रुग्णवाहिकांअभावी रुग्णांना योग्य उपचार मिळवण्यात उशीर होत असतानाच दुसरीकडे महापालिका प्रशासनाचे वाहन दुरुस्ती आगाराकडे किती अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.