कल्याण । महाराष्ट्र शासनाने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिक तसेच थर्माकॉल उत्पादनांवर बंदी घातली असताना सर्वत्र त्याची अंमलबजावणी कठोरपणे अंमलात केली जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात देखील प्लॅस्टिक बंदी मोहीम कठोरपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून जनतेचे प्लॅस्टिक-थर्माकॉल बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी सहयोग सामाजिक संस्था आणि उर्जा फौंडेशन सारख्या संस्थांचे सहाय्य घेतले जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात यापूर्वी पासून 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी होती. त्याबाबत महापालिकेकडून आवश्यकतेनुसार कारवाई केली जात असे. मात्र तरीही उघडपणे बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्याचा वापर दुकानदार व फेरीवाले करीत असत. नागरिक देखील त्याबाबत उदासीन असत. मध्यंतरी महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही काही महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक बंदीची घोषणा केली होती, तरीही कारवाई यथातथाच होत असे. मात्र शासनाने कठोर पावले उचलत प्लॅस्टिक तसेच थर्माकॉल उत्पादनांवर बंदी घालत त्याच्या सक्त अंमलबजावणीचे आदेश दिले.
प्लॅस्टिक तसेच थर्माकॉल उत्पादनांवरील बंदीची अंमलबजावणी परिणामकारक होण्याच्या दृष्टीने नागरिक, व्यापारी व दुकानदार-फेरीवाले यांचे प्रबोधन करण्याची गरज भासत आहे. त्यासाठी महापालिकेच्या मदतीसाठी आधीपासूनच प्लॅस्टिक बंदीसंदर्भात कार्य करणार्या कल्याण पूर्व येथील सहयोग सामाजिक संस्था आणि डोंबिवली येथील उर्जा फौंडेशन या संस्था धावून आल्या आहेत. महापालिकेच्या प्रभाग स्तरावर आरोग्य विभागामार्फत दुकाने विक्रेत्यांची तपासणी करून त्यांच्याकडे आढळणारे प्लॅस्टिक, थर्माकॉल इत्यादीबाबत जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. ड प्रभाग समिती कार्यालयामार्फतही अशी कारवाई करण्यात येत असून पालिका कर्मचार्यांसमवेत सहयोग सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करीत पत्रके वाटत आहेत. या संस्थेचे अध्यक्ष व कचर्यापासून व महापालिकेने कल्याण पूर्व विभागासाठी स्वच्छता दूत म्हणून निवड करण्यात आलेले विजय भोसले यांनी प्लॅस्टिक बंदी आणि कचर्यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. त्यांचे हे उपक्रम महापालिका क्षेत्रात मार्गदर्शक ठरले आहेत.
वर्षभरात 3 लाख 64 हजारांची दंड वसुली
राज्य शासनाच्या नियमानुसार महापालिका क्षेत्रात प्लॅस्टिक-थर्माकॉल उत्पादनांच्या बंदीबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. महापालिकेने दि. 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या वर्षात 3 लाख मेट्रिक टन प्लॅस्टिक जमा करण्यात आले असून दंडापोटी 3 लाख 64 हजार रुपये वसूल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सहयोग सामाजिक संस्था आणि उर्जा फौंडेशन यांच्या मदतीने दरमहा 5 मेट्रिक टन प्लॅस्टिक जमा करून ते रिसायकलिंग करिता पाठवले जाते. या संस्था घराघरातून प्लॅस्टिक गोळा करीत असल्याचे सांगण्यात आले.
प्लॅस्टिक बंदीला व्यापार्यांचा विरोध
पर्यावरणाला हानीकारक ठरणार्या प्लॅस्टिक पिशव्यांवर सरकारने सरसकट बंदी घालू नये अशी मागणी व्यापार्यांकडून करण्यात येत आहे. कल्याणच्या व्यापार्यांनी देखील प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावणाचे प्रश्न निर्माण होतात, पण या पिशव्यांना बंदी घातल्याने काही नवे प्रश्न निर्माण होतील असा मुद्दा उपस्थित केला आहे. एखादी वस्तू ग्राहकांना देणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात तर खाण्यापिण्याचे पदार्थ देणे आणखी कठीण होईल. कपडे व्यापार्यांनाही हाच प्रश्न सतावत आहे. प्लॅस्टिक पिशव्यांवर सरसकट बंदी घालण्यापेक्षा केवळ कॅरी बॅग आणि थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी घालावी, अशी मागणी येथील व्यापार्यांची आहे.