कल्याण-डोंबिवलीत वाहतूककोंडी फोडण्यासाठी सिग्नल प्रणाली

0

कल्याण । कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूककोंडीच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवजड वाहने, चारचाकी गाड्या, रिक्षा, दोनचाकी वाहने आणि महापालिकांच्या परिवहन सेवेच्या बसेस अशी लाखो वाहने रस्त्यांवरून धावतात. स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणार्‍या कल्याण-डोंबिवली या जुळ्या शहरातील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शहरात पुन्हा सिग्नल प्रणाली उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही यंत्रणा महापालिकेच्या माध्यमातून बसविण्यात येण्याऐवजी शहरातील सर्व समस्या खासगीकरणातून सोडवण्याचा आग्रह लोकप्रतिनिधीकडून धरला जात आहे. खासगीकरणातून जर सर्व बाबी होऊ लागल्या तर महापालिका कशासाठी हवी, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत वाहतूककोंडीच्या अनुषंगाने काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेअंती शहरात काही चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला. मात्र, पालिकेची आर्थिक स्थितीचा अंदाज घेता तूर्त ते शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. अर्थसंकल्पातही या विषयासाठी निधीची तरतूद नाही. त्यामुळे खासगीकरणाच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा उभारण्याशिवाय अन्य पर्याय नाही.

महानगरपालिकेने वाहतूककोंडीवर उपाय म्हणून
अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे. या यंत्रणेनुसार कल्याण-डोंबिवलीमध्ये स्वयंसंक्रमित सिग्नल यंत्रणा सक्रिय करण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, पार्किंगसाठी जागा, तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील वाहतुकीचा आढावा ही या नवीन प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत. कल्याण-डोंबिवलीतील वाहतुकीचे नियम मोडणार्‍या चालकांवर नवीन वाहतूक प्रणालीद्वारे कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्यांवर सीसीटीव्ही यंत्रणा सक्रिय करण्यात येणार असून, त्याद्वारे नियमांचे उल्लंघन करणार्‍या चालकांच्या गाड्यांच्या नंबर प्लेटची माहिती केंद्रीय वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. त्यानुसार वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे.

15 ते 20 चौकांमुळे वाहतुकींची कोंडी
गेल्या 10-12 वर्षांपूर्वी डोंबिवली शहरात सिग्नल यंत्रणा अस्तित्वात होती. त्यावेळी लोकसंख्या कमी असल्याने वाहनांची संख्याही कमी होती. विशेष म्हणजे त्या काळी रिक्षांचे प्रमाणही कमी होते. मग त्यावेळी सिग्नल यंत्रणा का बंद झाली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. डोंबिवली शहराचा विचार केला तर पूर्व-पश्‍चिम विभागात सुमारे 15-20 चौकांमुळे वाहतुकीची कोंडी होते. आता डिजिटल प्रणालीमुळे या समस्येवर पर्याय देण्यासाठी महापालिकेला काही कठीण नाही. कल्याण डोंबिवली महापालिका आता स्मार्ट सिटी होणार असून या स्मार्ट सिटीत सिग्नल प्रणाली होणारच आहे. मग खासगीकरणातून पुन्हा नवा पायंडा कशासाठी, असा सवाल येथील करदाते करत आहेत. शहरातील वाहतुकीचे नियम मोडणार्‍यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे. सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणार्‍याना हेरून त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी. असे झाले तर वाहतूककोंडीची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकेल. फक्त खासगीकरणातील सिग्नल प्रणालीने शहरातील वाहतूककोंडी मुक्त होईल, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.