कल्याण : सरकारच्या आदेशांप्रमाणे शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील २८५ खासगी शाळांमधील १६५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांची यादी ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिऱ्यांकडे पाठवली जाणार असून यानंतर या शिक्षकांच्या समायोजनाचा निर्णय घेतला जाईल.
मराठी शाळांची पटसंख्या घसरत आहे. यामुळे शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक निर्माण झाले आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी खासगी आणि सरकारी मराठी शाळांकडून शिक्षकांना विद्यार्थी जमा करण्याचे काम शैक्षणिक वर्ष संपतानाच सोपवण्यात येते. मात्र तरीही पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवण्यात उत्सुक असल्यामुळे मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. अनेक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची समस्या उद्भवली आहे. सरकारने प्रत्येक महापालिका आणि नगरपालिकांना अतिरिक्त शिक्षकांची संख्या कळवण्याचे आदेश दिले होते. पालिकेच्या कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा बंद करून या शिक्षकांना दोन वर्षांपूर्वीच सरकारकडे पाठवण्यात आल्याने पालिकेच्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची समस्या नसली, तरी पालिका क्षेत्रात असलेल्या २८५ खासगी शाळांतील तब्बल १६५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये रिक्त जागा असतील, त्या ठिकाणी या शिक्षकांना पाठवले जाणार आहे. जर शिक्षक जास्त झाले तर जागा रिक्त होईपर्यंत या शिक्षकांना प्रतीक्षायादीवर ठेवले जाणार असल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी जे. जे. तडवी यांनी सांगितले.