कल्याण नजीक म्हारळ गाव हादरले

0

कल्याण : कल्याण नजीकच्या म्हारळ गावांतील आंबेडकर नगर परिसरातील लक्ष्मीनगर मध्ये रविवारी पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास बैठ्या चाळीतील एका घराची भिंत कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. यातील जखमींवर उल्हास नगरच्या सेंट्रल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. मोहम्मद इस्लाम निजाम उद्दिष्ट शेख 45 आणि सैफुद्दीन अल्लाउद्दिन खान 40 अशी मृताची नावे असून निलम परवेज सिंग 23, परवेज बन्सी सिंग26, फिरदोज मोहम्मद शेख 30, आणि सोना इस्लामुद्दीन शेख 11, व खुशबू सैफूद्दीन खान 16 या पाच जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

म्हारळ गावात दरड पोखरून चाळीचे इमले
कल्याण नजीक असलेल्या म्हारळ गावात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून दरड पोखरून त्यावर चाळीचे इमले उभारले जात आहेत. त्यामुळे दरड आणि त्यावरील चाळी कोसळून अपघात होण्याची भीती कायमच व्यक्त केली जात होती. या ठिकाणच्या आंबेडकरनगर येथे प्रांतिक सरकारच्या जागेवर अतिक्रमण करून लक्ष्मीनगर नावाची चाळ भूमाफियांनी उभारली असून या चाळीतील 25 ते 30 खोल्या डोंगराच्या उतारावर बांधण्यात आल्या आहेत. यातील 11 आणि 12 नंबरच्या खोलीवर आज पहाटे साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास मागील बाजूस असलेल्या खोलीची भिंत कोसळली.

घटनास्थळाची ईधकार्‍यांनी केली पाहणी
घटना घडली त्यावेळी इस्लाम शेख आणि सैफुद्दीन खान यांच्यासह इतर जखमी गाढ झोपेत होते. इस्लाम आणि सैफुद्दीनवरच भिंतीचा ढिगारा कोसल्यामुळे या ढिगार्‍याखाली ते गाढले गेले. यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून इतर 5 जखमीवर ढिगार्‍याची माती उडाल्यामुळे त्यांना जखमी अवस्थेत बाहेर पडता आले. दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस प्रदीप कसबे, गटविकास अधिकारी अविनाश मोहिते. विस्तार अधिकारी एन जी देसाई. प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे, तहसीलदार अमित सानप पोलीस पाटील दिनेश देशमुख यांनी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली.