भिवंडी । ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग कल्याण शहरातील सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी किल्ला, खडकपाडा, मुरबाड रोडमार्गे एपीएमएसी असा वळवावा, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, रुपेश म्हात्रे, भिवंडीचे महापौर जावेद दळवी, उपमहापौर मनोज काटेकर आदी उपस्थित होते. त्यावेळी खासदार पाटील यांनी कल्याण मेट्रोचा मार्ग वळविण्याची आग्रही मागणी केली.
कल्याण शहराचा विस्तार होत असून, खडकपाडा व मुरबाड रस्त्यावर हजारो नागरिक राहत आहेत.
सद्यःस्थितीत कल्याण मेट्रो दुर्गाडीहून सहजानंद चौकातून थेट एपीएमसीत जाणार आहे. या मेट्रोचा नवे कल्याण मानल्या जाणार्या भागातील हजारो नागरिकांना फायदा होणार नाही. त्यामुळे सहजानंद चौकाऐवजी खडकपाडा, मुरबाड रोडमार्गे एपीएमसीमध्ये मेट्रोचा मार्ग वळविल्यास हजारो प्रवाशांचा फायदा होईल. त्यामुळे मेट्रोचा मार्ग बदलावा, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली. नव्या मार्गामुळे कल्याण शहरातील वाहतूककोंडीतूनही दिलासा मिळू शकेल, याकडे खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोच्या मार्गात हजारो रहिवासी विस्थापित होत आहेत. त्यात काही घरे 100 वर्षांहूनही जुनी आहेत. त्यामुळे या विस्थापितांचे पुनर्वसन करावे, भिवंडीतून जाणार्या मेट्रोच्या मार्गामुळे कल्याण रोडवरील दुकानदार व रहिवासी विस्थापित होणार आहेत. त्यांना न्याय देण्याचा आग्रह पाटील यांनी धरला.