उत्तर कोरीयाने संस्थापक अध्यक्ष किम इल सुंग यांच्या जयंतीनिमित्त लष्करी संचलनात आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन करण्याने पुन्हा एकदा देशादेशांमधील शस्त्रस्पर्धा चर्चेत आली आहे. या शस्त्रस्पर्धेत पुन्हा एकदा भारतीयांना तत्कालिन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या ‘ अमेरिकेने स्वत:ला जगाचा पोलिसपाटील समजू नये’ या विधानाची आठवण करावी लागेल. विकसनशील देशांमधील संबंध सतत तणावाचे राहावेत व त्यांच्यातील शस्त्रस्पर्धेचा फायदा आपल्याला आधुनिक तंत्राने बनवलेल्या शस्त्रसाहित्याच्या विक्रीसाठी घेता येत राहावा, हेच धोरण लादण्याचा प्रयत्न अमेरिकेचा राहिलेला आहे व तो एव्हाना विकसनशील देशांच्या लक्षातही आलेला आहे. जगावर आपल्याला अनभिषिक्त सत्ता गाजवता यावी , विकसनशील देशांचे अस्तित्व त्या-त्या देशांमधील जनतेच्या राष्ट्रीयत्वाच्या अहंभावासाठी राहावे व वास्तवात त्यांचे जागतिक पातळीवरील अवलंबित्व अमेरिकाकेंद्रीतच राहावे हा अमेरिकेचा खटाटोप इराकचा नेता सद्दाम हुसेनला ज्या फध्दतीने संपवले गेले त्यावरुनच सार्या जगाच्या लक्षात आलेलाही आहे.
अमेरिकेच्या या जगज्जेत्या स्वप्नाच्या महत्वाकांक्षेचे दुसरे टोक रशियाच्या हातात आहे. ते शीतयुध्दाच्या काळात मजबूत होते. रशियाच्या विघटनानंतर मात्र ते सैल झाले तरी शस्त्रस्पर्धेच्या बाबतीत दरम्यानच्या काळात घडलेल्या अन्य घडामोडींनी अमेरिकेला तोडीसतोड प्रत्युत्तर देण्याची प्रतिस्पर्धी गटांची उर्मी जागती ठेवलेली आहे. चीन, जपान, उत्तर कोरीया , फ्रान्स आदी बलाढ्य राष्ट्रे या उर्मीचे अन्य पदर आहेत. जशी परिस्थिती मिळेल तशी आपली ही छुपी महत्वाकांक्षा जगापुढे लक्षात आणून देण्यांची संधी अमेरिका शोधत असतेच कारण इस्लामी देशांच्या हातात असलेला तेलाचा व्यापारही अमेरिकेला आपल्या हातात घ्यायचा आहे. जगातील वेगवेगळ्या वादांमध्ये नाक खुपसून एकाचवेळी सर्वच पातळ्यावंर जशी मिळवता येईल तशी भूमिका मिळवून आपले अस्तित्व सिध्द करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असतोच. हे अस्तित्व सिध्द करताना आपण सर्वोच्च ठरलो पाहीजे; हे दाखवून देण्यासाठी तंत्रज्ञान, शस्त्रे विकून व व्यापारातून मिळवलेला पैसा खर्ची घालणे अमेरिकेला शक्यही होते. विकसनशील देशांच्या अस्तित्वासंदर्भात अमेरिकेची ही भूमिका बर्याच प्रमाणात पाताळयंत्री ठरत असली तरी जागतिकिकरणाच्या रेट्यात ती उद्योग-व्यापाराच्या आघाडीवर व्यवहारी सत्तेने उजवीही ठरताना दिसते आहे. ही व्यवहारी सत्ताच उखडून टाकण्यासाठी दक्षता घेण्याचे काम आता प्रतिस्पर्धी गटाला करावे लागणार आहे.
या दक्षतेचाच एक भाग अशा अर्थाने विकसनशील देश आता उत्तर कोरीयाने संस्थापक अध्यक्ष किम इल सुंग यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या लष्करी संचलनातील आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या प्रदर्शनाकडे उत्तर कोरीयाची पुढाकाराची भूमिका म्हणून पाहात आहेत. चीनची मदत मिळाली तर उत्तर कोरीयाचे आव्हान अमेरिकेला सहज मोडीत काढता येईल पण अशी मदत चीन सहज देणार नाही . इकडे भारतासोबतचे वादाचे मुद्दे व पाकला त्यासाठी हाताशी धरताना आधीच अमेरिकेच्या उपकारांखाली दबलेला पाकिस्तान , ही चीनची अडचण असावी. त्यातूनच उत्तर कोरीयाला अप्रत्यक्ष इशारा देण्यासाठी व इसिसच्या बिमोडासाठी अफगाणिस्तानात अमेरिकेने महाबॉम्बचा हल्ला घडवून आणण्याची खेळी केलेली आहे. या खेळीला तात्काळ उत्तर देत उत्तर कोरीयाने आपल्याकडच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचे अस्तित्व दाखवून दिलेले आहे. अमेरिकेचे हे वर्चस्ववादाचे राजकारण जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर तपासून पाहणार्या व यथावकाश गंमत पाहणार्या विकसनशील देशांच्या यादीत आघाडीवर असलेल्या भारताच्या भूमिकेलाही पुढच्या काळात महत्व येणार आहे. भारतापुढे पाक, चीनचे आव्हान असले तरी प्रदीर्घकाळ भारताने जागतिक समुदायापुढे मांडलेली भूमिका अमेरिकेला नाकारता येणार नाही, ती कशी हाताळणार हे पुढच्या किमान पाच-सात वर्षांत अमेरिकेला जगाला सांगावेच लागणार आहे.
उत्तर कोरीया द्विपसमुहात सध्या तणाव वाढवण्यात अमेरिका यशस्वी झालेली दिसत असली तरी या तणावाचे आशियाई देशांसह भारतीय उपखंडावर होणारे अप्रत्यक्ष परिणाम भारत, पाक , चीनच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत. या तणावाचे अमेरिकेचे कळकाढू अन्वयार्थ भारत, पाक चीनमार्गे इस्लामी देशांच्याही भूमिकांसाठी जागतिक समुदायात उत्सुकतेचा मुद्दा ठरणार आहेत. जागतिक समुदायाला उदात्तता समजावून सांगणारी भारतीय संस्कृतीने दिलेली विश्वबंधुत्वाची हाक या पार्श्वभूमीवर भारताचा दबदबा आणखी वाढवणारी ठरावी म्हणून ही वेळ भारतीय धुरीणांसाठीही कसोटीचीच म्हणावी लागेल.
विकास पाटील – 9552351231