कवडीपाट येथे उत्तरेकडील स्थलांतरित पक्ष्यांचे भरले संमेलन

0

वैविध्यपूर्ण पक्षांच्या पक्षीतज्ज्ञ विशाल तोरडे यांची माहिती

हडपसर : पुणे-सोलापूर महामार्गावर कवडी येथे उत्तरेकडून आलेल्या हजारो पाहुण्या पक्ष्यांचे संमेलन भरले आहे. या पक्ष्यांना पाहण्यासाठी पुणे शहर व परिसरातील पक्षीवेडे लोक गर्दी करत आहेत. पाहुण्या पक्ष्यांच्या अधिवासाने व त्यांच्या सुमधूर स्वरांनी कवडीचा आसमंत भरून राहिला आहे. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने रशिया व तिबेटमधून आलेली रंगीबेरंगी बदकं मध्य आशियातून आलेले शेकाटे व इतर पाणपक्ष्यांचा समावेश आहे.

पक्ष्यांना ग्रह-नक्षत्रांचा मार्गदर्शक खुणा म्हणून उपयोग

‘निसर्गयात्री’ या संस्थेचे संचालक पक्षी अभ्यासक विशाल तोरडे म्हणाले, हिवाळा सुरू होताच उत्तर गोलार्धात बर्फवृष्टी होऊन नद्या, जलाशय, सरोवरे गोठतात, जमीन बर्फाछादित होऊन अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. शिवाय थंडी वाढते. यासाठी उत्तरेकडील पक्षी लाखोंच्या संख्येने दक्षिणेकडे प्रयाण करतात. या प्रवासात पक्ष्यांना ग्रह-नक्षत्रांचा मार्गदर्शक खुणा म्हणून उपयोग होतो, या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पक्षी अभ्यास व त्यांच्या अधिवसांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी स्थानिक प्रयत्न करत आहोत.

स्थानिक पक्ष्यांचाही वावर

सुभग, नदी सुरय, शेकाट्या, खंड्या, कोतवाल, वेडा राघू, वारकरी, नकट्या (स्पूनबील), मुग्धबलाक, मोर बगळा, पिवळा धोबी, छोटा पाणकावळा, काळा शराटी, चमकदार शराटी, ब्राम्हणी बदक, कंठेडी चिखल्या, कवडा धिवर, ठिपकेदार नाचरा,निलांग, फूलटोचा, सिंजीर, हळद्या, चष्मेवाला, स्वर्गिय नर्तक, मराठा सुतार, तांबट, पाणभिंगरी, ब्राम्हणी मैना, दयाळ, खाटीक, टिटवी, युवराज, मोर यांसारख्या स्थानिक पक्षांचा वावर येथे कायम पाहवयास मिळतो.

आश्रयस्थान असुरक्षित

वारंवार बदलणारे वातावरण, पाणी प्रदूषण आणि नागरिकांचा राबता यामुळे पक्षांचे हे आश्रयस्थान असुरक्षित झाले आहे. शहरातील पाषाण, बंडगार्डन, धायरी, खडकवासला, पाचगाव पर्वती व मुळा-मुठा नदीच्या परिसरात पक्षी निरीक्षणाला चांगला वाव आहे. मात्र, नदी पात्रात साचणारे प्लॅस्टिक, धागे, कचर्‍यातून येणार्‍या इंजेक्शनच्या सुया व बेसुमार वृक्षतोड तसेच शिकार्‍यांकडून पक्षांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
 विशाल तोरडे, पक्षीतज्ज्ञ