कवडी पाट येथे देशी-परदेशी पाहुण्यांचे आगमन

0

हडपसर : हिवाळा सुरू झाला की स्थलांतरित परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. कवडी पाट येथे लडाख, तिबेट, सैबेरिया या देशातून लाखोंच्या संख्येने पक्षी दाखल होतात. पक्षांचे भव्य संमेलन पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी वाढायला आता सुरुवात झाली आहे. दिवाळी झाली की रानावनातील हिरवे लुसलुशीत गवत हळूहळू पिवळे पडते. अंगाला झोंबणारा गार वारा गुलाबी थंडी घेऊन येतो. सृष्टी धुक्याची तरल चादर पांघरते आणि परदेशातील विविध प्रजातींच्या पक्ष्यांच्या आगमनाची चाहूल लागते. सध्या हडपसर येथील कवडी पाट मुक्कामी अनेक परदेशी पक्षी दाखल झाले आहेत. या पाहुण्या पक्ष्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या अभ्यासासाठी पक्षीप्रेमी दुर्बीण, कॅमरा घेऊन मुळा-मुठा नदीच्या किनारी, पाणवठ्यांवर गर्दी करू लागले आहेत.

काही परदेशी पक्षी
यंदा आलेल्या परदेशी स्थलांतरित पक्ष्यांमध्ये ब्लॅक विंग्ड स्टिल्ट (शेकाट्या), चक्रवाक (ब्राह्मणी शेल्डक), चक्रांग (कॉमन टिल), थापट्या (नॉदर्न शॉव्हेलर), भिवई (गार्गनी), राखी धोबी (ग्रे वॅगटेल), तुतारी (वुड सँडपाइपर), दलदल ससाणा (युरेशियन मार्श हॅरियर), भोरडी (रोजी पास्टर), तांबोला (रेड थ्रोटेड फ्लाय-कॅचर), नदीसूरय (रिव्हर टर्न) अशा अनेक पक्षांचा समावेश आहे.

स्थानिक पक्षीही दाखल
कवडी पाट येथे परदेशी स्थलांतरित पक्षांबरोबरच स्थानिक स्थलांतरित (भारतीय) पक्ष्यांमध्ये राखी बदक (स्पॉटबिल्डक), टिबुकली (डॅबचिक), पाणकावळा (लिटल कॉर्मोरेंट), काळा शराटी (ब्लॅक आयबिस), पांढरा शराटी (व्हाइट आयबिस), ताम्र शराटी (ग्लॉसी आयबिस), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन) चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), राखी बगळा (ग्रे हेरॉन), पाणथळ चरचरी (पॅडी फील्ड पिपिट), वंचक (पॉन्ड हेरॉन) जंगल मैना आदी पक्षी लाखोंच्या संख्येने दाखल झाले आहेत.

स्थलांतर हा अनाकलनीय अध्याय
स्थलांतर हा पक्षी जीवनातील एक अनाकलनीय अध्याय आहे. पृथ्वीतलवार उत्तर धृवापासून दक्षिण धृवापर्यंत पक्ष्यांची निवासस्थाने आढळतात. मात्र हवामानातील बदलामुळे मूळ वस्तिस्थान सोडून दुसरीकडे स्थलांतर करावे लागते. स्थलांतर करून आलेले हे पक्षी आपल्याकडे कवडी पाट बरोबरच पुण्याजवळील भिगवण, पाषाण तलाव, वीर धरण या परिसरात पाहायला मिळतात.
– विशाल तोरडे, संचालक, निसर्गयात्री संस्था