भुसावळसह रावेर तालुक्यातील शिक्षकांचा नियोजन समितीत समावेश
भुसावळ- शालेय शिक्षण विभागाद्वारे शैक्षणिक विचारांची उपयोगिता व परीमाणकारकता यांचे आदानप्रदान करण्यासाठी तसेच गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण या विषयावर शिक्षणाच्या वारीचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले आहे. या शिक्षण वारीसाठी नियोजनाची बैठक नुकतीच भुसावळातील गटसाधन केंद्रात झाली. अध्यक्षस्थानी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था जळगावचे अधिव्याख्याता शैलेश पाटील होते. गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे विस्ताराधिकारी रागिणी चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली
29 ते 31 दरम्यान शिक्षण वारी -शैलेश पाटील
शैलेश पाटील म्हणाले की, नाशिक विभागाची शिक्षण वारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे 29 ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे. या बैठकीत विविध समित्यांचे वाटप करण्यात आले आहे. भुसावळ व रावेर तालुक्यावर तीन समित्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्धी समिती विद्युत समिती व स्वच्छता समिती यांचा समावेश आहे.
खानदेशाची ओळख झाली पाहिजे
सात जिल्ह्यातील हजारो शिक्षक या वारीला भेट देणार असून आपल्या खानदेशातील संस्कृतीची ओळख शिक्षकांना झाली पाहिजे या दृष्टिकोनातून विविध बॅनर्स लावणे तसेच येणार्या शिक्षकाला मार्गदर्शक माहिती पूर्णपणे मिळावी व वारीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध मार्गदर्शक फलक लावणे व माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसिद्धी समितीचे असल्याचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते म्हणाले.
स्वच्छतेवर भर आवश्यक
सध्या देशभरामध्ये स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे तसेच स्वच्छता या परिसरात राहील या दृष्टिकोनातून स्वच्छता समितीवर ती मोठी जवाबदारी आहे याकरता बारकाईने नियोजन करून परीसर स्वच्छ राहील याकडे लक्ष देण्यासाठी नियोजन यावेळी करण्यात आल्याचे शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे म्हणाले.
स्टॉलसाठी विद्युत पुरवठा नियोजनपूर्वक करा
महाराष्ट्रभरातून 50 उपक्रमशील शिक्षक या ठिकाणी आपल्या नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाची माहिती शिक्षिकांना देणार आहे यासाठी संगणक प्रोजेक्टर व इतर बाबींचा वापर या ठिकाणी करण्यात येणार आहे यामुळे प्रत्येक स्टॉलवर विद्युत पुरवठा करताना सुरक्षात्मक उपाययोजना करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात यावा, असे शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण म्हणाल्या.