कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा ९ रोजी पदवीप्रदान समारंभ

0

अमेरिकेतील सुप्रसिध्द भारतीय उद्योजक डॉ. मुकुंद करंजीकर यांची राहणार प्रमुख उपस्थिती
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 27 वा पदवीप्रदान समारंभ शनिवार, दि. 9 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होत असून, त्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या दीक्षांत समारंभासाठी अमेरिकेतील सुप्रसिध्द भारतीय उद्योजक डॉ. मुकुंद करंजीकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रमाणपत्रावर क्यूआर कोडचा होणार वापर
पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव छापण्यात आले आहे. तसेच स्नातकाच्या आईचे नाव देखील प्रमाणपत्रावर आहे. प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडचा उपयोग मोबाईल अ‍ॅप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणीसाठी होणार आहे. या वर्षापासून प्रमाणपत्रावर विद्यापीठाचा होलोग्राम असणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्राची सुरक्षितता अधिक वाढेल. यावर्षी दीक्षांत समारंभाच्या दिवशी प्रशासकीय इमारती जवळ स्नातकांसाठी सेल्फीस्टँड उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर स्नातकांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे. याशिवाय मोबाईल मॅसेजद्वारे देखील डिग्री कोड पाठविण्यात आला आहे. स्नातकांनी पदवी ग्रहण करण्यासाठी दीक्षांत समारंभाच्या दिवशी हा प्राप्त झालेला डिग्री कोड, ओळखपत्र किंवा ओळखदर्शक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. स्नातकांना पदवी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, याकरीता पदवी प्रमाणपत्राचे वाटप अभ्यासक्रमनिहाय काऊंटरवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. समारंभस्थळी सकाळी ठिक 9.00 वाजता विद्याथ्र्यांनी / निमंत्रितांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या पत्रकार परिषदेला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रा.ए.यू.बोरसे, जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील उपस्थित होते.

38 हजार 912 स्नातक
या पदवीप्रदान समारंभात 38 हजार 912 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे 15 हजार 631 स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे 4 हजार 466 स्नातक, मानव्य विद्याशाखेचे 17 हजार 788 आणि आंतर विद्याशाखेचे 1057 स्नातकांचा समावेश आहे. गुणवत्ता यादीतील 90 विद्याथ्र्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी 22 हजार 419 विद्याथ्र्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये 251 पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत.