कवयित्री राधाबाई वाघमारेंसह अनेक मान्यवरांचा झाला गौरव
पिंपरी : कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणजे सारस्वतांची वाहती गंगा असून, सूर्याप्रमाणे बहिणाबाईंची कविता नित्यनूतन असते. तसेच बहिणाबाई यांनी निसर्गाचे संतत्व कवितेच्या माध्यमातून लौकिकात आणले. संत एकनाथ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मराठी साहित्याला रूपकांचे काव्य प्रदान केले, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि संत वाड:मयाचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी काढले. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान आणि लेवा पाटीदार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या सहासष्टाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते.
डॉ. देखणे यांचा गौरव
दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ज्ञ भास्करराव आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात ‘बहिणाबाई चौधरी साहित्यरत्न सन्मान’ पुरस्काराने डॉ. रामचंद्र देखणे यांचा गौरव करण्यात आला. अक्षरांची ओळख नसतानाही कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी कवितेतून ‘अक्षर’ वाड:मय निर्माण केले. तसेच आपले आदर्श डोक्यावर घेऊन नाचताना दुसर्यांचे आदर्श पायदळी तुडवू नयेत, यालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात, असेही डॉ. देखणे यावेळी म्हणाले.
विविध मान्यवरांचा गौरव
यावेळी ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांना ‘बहिणाबाई चौधरी साहित्यसाधक सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला; तसेच महाराष्ट्रातील विविध भागांत सामाजिक बांधिलकीतून कार्य करणार्या व्यक्तींना ‘बहिणाबाई चौधरी समाजभूषण सन्मान’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये नीना खर्चे, नीलेश पाटील, भूषण पाटील, सोमनाथ कोरे, डॉ. रोहिणी कुलकर्णी, डॉ. विठ्ठल माळी, प्रकाश कोरे, अण्णासाहेब पाटील, अमित शेटे, सिकंदर तांबोळी आदींचा समावेश होता.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, नगरसेविका शारदा सोनवणे, नगरसेविका अनुराधा गोरखे, किर्लोस्कर ऑईल इंजिनचे उपाध्यक्ष अजित हर्डीकर, उद्योजक अनिल परतणे, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठाने अध्यक्ष पंकज पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बशीर मुजावर, महेश भागवत, सुचेता गटणे, सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती. लेवा पाटीदार मित्रमंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे यांनी प्रास्ताविक केले. तर स्मिता चौधरी यांनी बहिणाबाईंच्या ‘खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला’ या कवितेचे सादरीकरण केले. प्रकाश घोरपडे यांनी भैरवीगायन केले. कार्यक्रमाच्या संयोजनात महेश बोरोले, संजय भंगाळे, दत्तात्रय पाटील, देवेंद्र पाटील, अशोक तळेले, विलास पाटील, उमेश पाठक, वैशाली चौधरी, ऊर्मिला पाटील, रामकृष्ण राणे, प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य केले. प्रा. कमल पाटील यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. लीलाधर पाटील यांनी आभार मानले.
साहित्य हे अंतकरणातून प्रकट व्हावे
यावेळी ज्येष्ठ विधिज्ज्ञ भास्करराव आव्हाड म्हणाले की, बहिणाबाई या निरक्षर होत्या, पण अडाणी नव्हत्या. त्यांच्याकडे उपजत शहाणपण होते. फक्त अवघड आणि विद्वत्तापूर्ण शब्दांनी वाड:मयनिर्मिती होत नाही, तर साहित्य हे सहजस्फूर्त आणि अंत:करणातून प्रकट झाले पाहिजे. अनुभूती, प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या समन्वयातून उत्स्फूर्त साहित्यनिर्मिती होते. त्याचे बहिणाबाईंचे साहित्य हे चांगले उदाहरण आहे.