देहूरोड : देहूरोड येथे कवायत सुरू असताना चक्कर येऊन पडल्याने एका जवानाचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे घोषीत केले. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. चंद्रकांत चोखाजी दाभाडगे (वय 39) असे या जवानाचे नाव आहे.
देहूरोड येथील 787 एडी ब्रिगेडमध्ये शिपाई पदावर तो कार्यरत होता. सध्या या ब्रिगेडमधील जवानांचे त्रैमासिक संचलन व शारिरिक क्षमतेवर आधारीत कवायती सुरू आहेत. त्यात जवानांचा एक चमू कवायती करत असताना हा प्रकार घडला. 1999 मध्ये लष्करात भरती झालेले चंद्रकांत दाभाडगे यांना लष्करी सेवेत जवळपास 18 वर्षांचा अनुभव आहे. पत्नी सविता आणि तेजस (वय 14) व राजेश (वय 13) ही दोन मुले अशा परिवारासह ते इंद्रायणीदर्शन येथे सरकारी वसाहतीत राहत होते. तळेगाव येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या गावी नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.