कविंदरसिंग बिष्ट उपांत्यपूर्व फेरीत

0

हॅम्बर्ग । भारतीय बॉक्सर कविंदरसिंग बिष्टने पुरूषांच्या 56 किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 24 वर्षीय कविंदरने दोन वेळा विश्‍वविजेतेपद जिंकणार्‍या अल्जेरियाच्या मोहम्मद फ्लिसीला 3-2 अशी मात देत आपल्या वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

पुढील लढतीत कविंदरसिंगचा सामना कोरियाच्या इंक्यू किमशी होईल. हा सामना जिंकून कविंदरने उपांत्य फेरीत स्थान मिळवल्यास देशासाठी किमान एक कांस्यपदक निश्‍चित होईल. कविंदरने अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्यानंतर सांगितले की, सामन्यातील निकालामुळे संतुष्ट आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूचा आम्ही चांगला अभ्यास केला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कशा पद्धतीने खेळायला लागेल याचा अंदाज आला होता. माझा हा विजय मार्गदर्शक, सहयोगी स्टाफ आणि भारतीय बॉक्सिंग महासंघाला समर्पित करतो.