सृजनभान कवितच्या प्रकाशन समारंभात केले प्रतिपादन
पिंपरी : कवितालेखन हे एक व्रत असून ते निष्ठेनेच पाळले पाहिजे. कविला येणारे अनुभव तो कवितेत व्यक्त करीत असतो. अशाच सुंदर आणि निरलस कविता सृजनभान पुस्तकात सापडतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी केले. कवयित्री मानसी चिटणीस लिखित आणि संवेदना प्रकाशन निर्मित ‘सृजनभान’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा.बागवे बोलत होते. साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ कवी सतीश सोळांकुरकर, रमेश वाकनीस, नितीन हिरवे, आनंद पेंढारकर, हेमंत राजाराम आदी उपस्थित होते.
निरलस, निःस्पृह कविता!
ज्येष्ठ कवी सोळांकुरकर म्हणाले की, एखाद्या जाळीदार टोपलीत दिवा लावल्यावर प्रकाशाचे जे कवडसे पडतात, तशा कविता मानसी चिटणीस यांच्या ‘सृजनभान’ या कवितासंग्रहात विखुरल्या असल्यातरी त्यांच्यात एक आंतरिक लय गवसते. निरलस, नि:स्पृह आणि प्रामाणिकपणे जपता यावी अशी कविता या संग्रहात सापडते. रमेश वाकनीस म्हणाले की, या पुस्तकामध्ये नवखेपणापेक्षा अनोखेपण जाणवते. कवितालेखन हा एक निर्हेतूक प्रवास असतो. ‘सृजनभान’ मधील कविता ही एकांतात अनुभवायची बाब आहे.
निर्मिती होते ती एकांती!
प्रा. बागवे पुढे म्हणाले की, अनुभव हा रिचवावा लागतो. अन्यथा तो उथळ होतो. अनुभवाचे गर्भ ज्याला कळतात तोच गर्भित अर्थाचे लिहितो. सृजन म्हणजे निर्मिती अन् ती एकांतीच होते आणि त्यातून जे अंकुरते ते लोकांती होते. कविता हे एकांतात म्हटलेले भजन आहे म्हणून कवितेने प्रसिद्धीचा सोस बाळगू नये. तसेच कवी हा मुक्त असतो, त्याने कुठलाही झेंडा मिरवू नये. तार्किक, अतार्किक आणि तर्कातीत असे अनुभवाचे तीन प्रकार असतात. संत ज्ञानेश्वर, कबीर, तुकाराम, रामदास, रवींद्रनाथ टागोर, आरती प्रभू यांचे संदर्भ आणि काव्यपंक्ती उद्धृत करीत प्रा. बागवे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सृजनाचे भान राहो!
कवयित्री मानसी चिटणीस यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, आभाळाशी बोलताना जे शब्दभान येतं गेलं, त्यातूनच ‘सृजनभान’ची निर्मिती झाली. मला आलेलं हे सृजनाचं भान कायम राहो. याप्रसंगी भाग्यश्री कुलकर्णी, साहेबराव ठाणगे, स्वाती ठकार, प्राजक्ता बजाज, मधुरा कुलकर्णी, शोभा जोशी यांनी सृजनभान मधील कवितांचे अभिवाचन केले. विजय चिटणीस, वैभव साठे, समृद्धी सुर्वे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास घुमरे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन हिरवे यांनी आभार मानले.