पुणे । हे श्याम सुंदरा राजसा मनमोहना, सुहास्य तुझे मनास मोही, मी मज हरपून बसले गं, केव्हा तरी पहाटे अशा इंदिरा संत, ग्रेस, शंकर रामाणी, सुरेश भट यांच्या रचनांच्या सादरीकरणाने रसिक तृप्त झाले. प्रख्यात गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी काही परिचित असलेल्या तर, काही नवीन रचनांचा सुरेल वर्षाव रसिकांवर केला. मंगलदीपमधून मंगल स्वरांनी गायिका पद्मजा फेणाणी यांनी प्रसिद्ध कवींच्या अनेक रचना आपल्या सुमधुर गायकीने रसिकांसमोर खुलविल्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मंगलदीप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ओम नमोजी आद्या…मंगलचरणा गजानना… या गणेश वंदनेने झाली. यानंतर दीपअमावस्येनिमित्त कवीवर्य शंकर रामाणी यांची रचना असलेले दिवे लागले रे दिवे लागले… या गीताच्या सादरीकरणाने रसिकांवर मोहिनी घातली. शंकर रामाणी यांनी रचलेल्या माझिया दारात चिमण्या आल्या… या गीताला रसिकांनी विशेष दाद दिली. कवीयित्री इंदिरा संत यांची रचना असलेले भिंती रंगल्या स्वप्नांनी, झाल्या गजांच्या कर्दळी… या गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. कवी ग्रेस यांनी रचना असलेले पाऊस कधीचा पडतो… या गीताने रसिक मंत्रमुग्ध झाले. राजू जावळकर, समीर शिवगार (तबला), मनोज देसाई (हार्मोनिअम), मंदार पारखी (सिंथेसायझर), नागेश भोसेकर (रिदम मशीन) यांनी साथसंगत केली. तसेच गौरी साबळे, देवयानी गौड, मैथिली मुंगी, सोनाली बोरकर यांनी सहगायन केले.