अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत धरणगावचे कवी प्रा. वा. ना आंधळेंचे मत
भुसावळ- कवितेने मानवी जीवन अन् समाजाची दिशा मिळून दशा बदलते. भावभावनांची आंदोलने मनामनात पेरण्याचं हे सशक्त माध्यम आहे. शिक्षकाने कविता लय, ताल, सुरात विद्यार्थ्यांच्या काळजात पोहोचवून लळा लावावा. जेणेकरून साहित्याची गोडी लागण्यास मदत होईल, असे मत धरणगाव महाविद्यालयाचे प्रा. वा. ना. आंधळे यांनी व्यक्त केले. भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने संदीप वसंतराव पाटील यांच्या मातोश्री पुष्पा पाटील यांच्या आठवणी जपण्यासाठी पुष्पांजली फिरती प्रबोधनमाला आयोजित केली आहे. तिचे प्रथम पुष्प यावल तालुक्यातील भालोद महाविद्यालयात गुरुवारी गुंफण्यात आले. त्यात ‘काळजातल्या कवितांतून संस्कार पेरणी’ हा विषय मांडताना प्रा. आंधळे हे बोलत होते.
विचार मंचावर यांची उपस्थिती
अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे होते. विचारमंचावर भालोदच्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दिलीप चौधरी, संचालक अरुण चौधरी, नारायण चौधरी, भुसावळ जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघाचे समन्वयक अरुण मांडळकर, फैजपूरचे प्रा.उमाकांत पाटील, उपप्राचार्य मुकेश चौधरी, चोपड्याचे नरेंद्र पाटील, शिवाजी पाटील, धनंजय पाटील यांची उपस्थिती होती. प्रथम विचारपुष्प अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे यांचे वडील मधुकर नेवे यांच्या स्मरणार्थ गुंफण्यात आले. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख संजय भटकर, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील तर सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. जतीन मेढे यांनी केले. आभार समन्वयक ज्ञानेश्वर घुले यांनी केले. उपक्रमासाठी देविदास येवलेकर, वसंतराव पाटील, प्रभाकर नेहेते, राजू वारके, देव सरकटे, संदीप सपकाळे, प्रदीप चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व संस्थांचालकांनी सहकार्य केले.
भुसावळचा आदर्श समोर ठेऊ
सांस्कृतिक चळवळ जिल्ह्यात तुलनेने भुसावळातअधिक प्रवाहीत होत आहे. या ठिकाणी गीत, संगीत, नाटक, व्याख्यानांची वाढणारी अभिरूची हेवा वाटावा अशीच आहे. त्यांचाच आदर्श समोर ठेऊन भालोद येथेही कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यावर भर देऊ. विद्यार्थी रसिक डोळ्यासमोर ठेऊन राबवली जाणारी फिरती प्रबोधनमाला पथदर्शी आहे, अशी भावना माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ जावळे यांनी व्यक्त केली.
नात्यांची ग्रंथालये जीवापाड जपा
कविता जन्मापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या वळणावर माणसाला भेटते. घराघरातील आजी-आजोबा नावाची ग्रंथालये हरवत चालली आहेत. जन्मदात्यांना वृद्धाश्रमात सोडून त्यांच्या अंत्ययात्रेला येण्याचेही मुल-मुली टाळतात ही शोकांतिका आहे. संवेदनशील मनाला वेदना देणारे हे चित्र बदलण्यासाठी संस्कारांची पेरणी सांस्कृतिक उपक्रमांतून होते. साहित्याची निर्व्याज सेवा केली तर ते नोकरीसोबत भाकरीही देते, असा अनुभव प्रा. आंधळेंनी सांगितला.
ताल-सुरातील कवितांना दाद
‘धरू नका ही बरे, फुळावर उडती फुलपाखरे’ या कवितेला दाद मिळाली. ‘आई मला जन्म घेऊ दे’ ही कविता ऐकताना दर्दी मान्यवरांसह विद्यार्थी-विद्यार्थिनींचे डोळे पाण्याने डबडबले. ‘पप्पा माझ्या आईला बोलू नका, स्त्री जन्म आहेच आधी मुका’ या गीतानेही व्याख्यानाची उंची गाठली. कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ना. धों. महानोर, भा. रा. तांबे, बा. भ. बोरकर, राम जोशी यांच्या आशयबद्ध कविताही प्रा. आंधळेंनी सादर करून रसिकांना खिळवून ठेवले. दरम्यान, शुक्रवार, 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता वरणगावच्या महात्मा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात धरणगावचे कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे हे ‘विद्यार्थी जीवन समृद्ध करणारा काव्यानंद’ हा विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत.