पिंपरी-चिंचवड : कवितेच्या अनेक व्याख्या आहेत त्यांचा धांडोळा घेऊन आपली स्वतःची अशी व्याख्या कवीने शोधायची असते. ‘स्व’मधल्या शक्यता तपासून पाहणे म्हणजेच कवितेची अभिव्यक्ती होय! असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री आश्लेषा महाजन यांनी केले.समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आयोजित स्वर्गीय विजयराव कापरे स्मृतिप्रीत्यर्थ चौथ्या समरसता काव्यमैफल करंडक स्पर्धा 2017 मधील विजेत्यांना यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. कॅप्टन कदम सभागृह, सावरकर सदन, निगडी-प्राधिकरणात रविवारी ही स्पर्धा झाली. अध्यक्षस्थानी संगीतकार मधू जोशी होते. यावेळी ज्येष्ठ गायक श्रीपाद जोशी यांची प्रमुख उपस्थित होते.
कवीने शब्दसंपत्ती वाढविली पाहिजे
स्पर्धेचे उद्घाटक ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. हेमंत हुईलगोळकर म्हणाले, ‘गद्यात खूप पाल्हाळ असते, म्हणूनच बहुधा कवितेची निर्मिती झाली असावी. कविता आपल्यात असतेच, ती व्यक्त झाली की कवी रिक्त होत असतो. सहज-सोपे लिहिता आले पाहिजे आणि तेच खूप अवघड असते. कवीला दुसर्या कवीच्या किमान पन्नास कविता पाठ हव्यात; तसेच कवीने शब्दसंपत्ती वाढवली पाहिजे! जोशी म्हणाले, समरसतेमध्ये सामावून घेण्याची भावना आहे; परंतु समाजातच नव्हे तर कुटुंबातदेखील एकमेकांना समजून घेण्याची भावना नष्ट होते आहे. कवितेमधील शब्द हे स्वतःपेक्षाही समाजाला आनंद देणारे असावेत. लिखित शब्द बलवान असेल तर वाचिक शब्द मोहरतो. शब्दांच्या श्रीमंतीने रसिक आकृष्ट होतात. कविता ही नॅचरल डिलिव्हरी पाहिजे, ओढूनताणून केलेले सीझेरिन नको! कविता त्रयस्थपणे लिहिता आली पाहिजे! असे विचार मांडले. समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष रमेश वाकनीस यांनी प्रास्ताविक केले.
राज्भरातील कवींचे संघ सहभागी
महाराष्ट्राच्या विविध भागांतून काव्यमैफल करंडक स्पर्धेत कवींचे संघ सहभागी झाले होते. त्यातील अनाहिता, पुणे या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. समरसता काव्यमैफल करंडक, रोख रक्कम रुपये दोन हजार आणि प्रशस्तिपत्रक देऊन विजेत्या संघाला सन्मानित करण्यात आले. शीतल थिटे आणि सुरेश कोकिळ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले; तसेच निकालाविषयीचे विवेचन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : अनाहिता, पुणे. काव्यगंधाली, पुणे. नीरजा, चंद्रपूर., उत्कृष्ट काव्यलेखन : रोशन पिलेवान, मदन देगावकर, दिनेश भोसले.
उत्कृष्ट सादरीकरण : अरुंधती वैद्य, माधवी सप्रे, संगीता वेताळ. उत्कृष्ट सूत्रसंचालक : माधवी पानसरे
कार्यक्रमाच्या संयोजनात सुहास घुमरे, चंद्रशेखर जोशी, बाळासाहेब सुबंध, पंजाबराव मोंढे, विनिता माने, मंगला पाटसकर, समृद्धी सुर्वे, अमेय पिसाळ, कैलास भैरट, प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य केले. मानसी चिटणीस आणि उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. शोभा जोशी यांनी आभार मानले.