मलिष्काने मुंबई मनपाला टार्गेट करून सुरू केलेला झोल-झोलचा फिव्हर खड्ड्यांमार्गे येऊन विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात धुमाकूळ घालत आहे. या फिव्हरच्या तडाख्यात आतापर्यंत अनेकजण सापडले. या निमित्ताने अनेक कवी निर्माण झाले हेही विशेष. यामध्ये सोमवारी नंबर आला तो कविवर्य जयंत पाटील यांचा. कवी ही पदवी आम्ही दिली नसून त्यांनीच स्वतः कवी झाल्याचे सांगितले. विरोधी पक्षात असल्यावर जास्त काम नसत त्यामुळे शनिवार, रविवार मी स्वतः ही कविता लिहिलीय असे सांगत नव्या कवीला दाद द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. 293 अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रामधील समस्यांबाबत विरोधी पक्षातर्फे मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर बोलताना कवितेच्या माध्यमातून व्यंगबाण त्यांनी भाजप आणि सेना संबंधांवर सोडले.
लाचार सत्तेसाठी, झोल झोल झोल झोल,
जनतेचा वाजतोय, ढोल ढोल ढोल ढोल,
देवेंद्र वाघाला फिरवतोय, गोल गोल गोल गोल,
सेना, तुझा बीजेपीवर भरवसा नाय काय!,
सेनेला दिला गाजर,
गाजराचा आकार कसा लांब लांब,
देवेंद्र म्हणतोय सेनेला थांब थांब,
वाघाचा झालाय बकरा,
सेना तुझा बीजेपीवर भरोसा नाय काय…!
अशा स्वरूपातील तालात आणि सुरात नसलेली मात्र आशयगर्भ कविता त्यांनी प्रस्तुत केली. या कवितेला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बँक वाजवून दादही दिली. यावेळी कुणीतरी रामदास आठवले यांचेही नाव घेतले, त्यावर मी एवढा मोठा कवी नाही असे जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या कवितेची मात्र दिवसभर चर्चा झाली हे विशेष.
विरोधी महिला सदस्यांचा एल्गार
सभागृहात चर्चा करताना विरोधी पक्षातील महिला सदस्यांना चर्चेसाठी परवानगीच मिळत नव्हती. यामुळे विरोधी पक्षातील महिला सदस्य आज चांगल्याच आक्रमक झाल्या. महिला अदारांना मुद्दामून बोलू दिले जात नाही. आम्हालाही बाजू ठेवण्याची संधी मिळावी, अशी मागणी करत वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आक्रमक झाल्या. वारंवार महिला आमदार बोलण्यासाठी उभा राहिल्याने अध्यक्ष देखील संतापले. एवढे होऊनही बोलण्यासाठी संधी न मिळाल्याने विरोधी पक्षातील महिला सदस्यांनी सभात्याग केला. यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमच्या महिला सदस्यांवर अन्याय होत असल्याचे सांगताच अध्यक्षांचा पारा वाढला. पुरुष आमदारांनी जास्त वेळ न घेता त्यांनाही बोलायला मिळू शकेल याची काळजी घेण्याचे सांगत तुम्हीच महिला सदस्यांचे नाव खाली टाकता असे सुनावले.
मुंडेंना सभापती करा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या विषयावर लक्षेवधी सुरू असताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. मुंडे मात्र प्रत्येक सदस्याला व्यवस्थित उत्तरे देत होत्या. दरम्यान एका सदस्यांच्या प्रश्नांचे उत्तर देत असताना दुसरा सदस्य मध्येच सवाल करत असल्याने मुंडे संतापल्या. मात्र आपला राग कंट्रोल करत त्यांनी समजावण्याचा सुरात हे योग्य नसून अशा प्रकारे मध्येच उत्तर थांबविल्याने दुसऱ्या सदस्यांवर अन्याय होतो त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी जयंत पाटील यांनी एवढं समजावून सांगताहेत, पंकजाताईंना सभापती करा असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. पंकजा ताई, सभापतीही हसू आवरू शकले नाहीत.
- निलेश झालटे