ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांचे प्रतिपादन
पिंपरी-चिंचवड : कविता हा प्राणांचा उद्गार आहे. ज्यावेळी मूल्ये आपल्या रक्तात खेळायला लागतात; तेव्हाच संस्कृती पुनरुज्जीवित होते. कवीने अनुभवाच्या शक्यता सांगाव्यात, उपदेश किंवा प्रबोधन करण्याच्या भानगडीत पडू नये. साहित्यिक हे दोन प्रकारचे असतात. त्यापैकी जे अवतरण चिन्हातले असतात, तेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मांडवात दिसतात; तर बाकीचे मांडवाबाहेरच राहतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी केले. समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कवितेतून कवितेकडे’ या पाचव्या एकदिवसीय कवी संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. बागवे बोलत होते. श्री केदारेश्वर मंदिर सभागृह, पेठ क्रमांक 24, निगडी-प्राधिकरण येथे रविवारी हे संमेलन पार पडले.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक थोरात, सुनील भणंगे, पंजाबराव मोंढे, समरसता साहित्य परिषद शाखाध्यक्ष रमेश वाकनीस उपस्थित होते. तसेच समरसता साहित्य परिषद उपाध्यक्षा शोभा जोशी, चित्रकार केशव कासार, सुनीता केदार, प्रा. तुकाराम पाटील, झुंजार सावंत, नंदकुमार मुरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
साहित्य संमेलन ही जत्रा!
प्रा. अशोक बागवे म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने ही एक संस्था आयोजित करते. या संमेलनाचा अध्यक्ष कोण निवडून आणायचा, हेदेखील संस्थाच ठरवते. संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक हा निव्वळ फार्स असतो. ठराविक मतदार हाताशी धरून या निवडणुका जिंकल्या जातात. संस्था कोणत्या ठिकाणी मांडव घालते? त्याचे कंत्राटदार कोण? यावर त्या संमेलनात कवींना स्थान मिळते. तसेच साहित्य संमेलन ही जत्रा असते. त्यामुळे ज्यांना फक्त मिरवायचं असेल त्याच कवींनी साहित्य संमेलनाच्या मांडवात जाण्याचा आग्रह धरावा, असे प्रा. बागवे यांनी सांगितले.
तीस कवींनी नोंदविला सहभाग
दुसर्या सत्रात ’खरे प्रतिभावंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवापर्यंत का पोहचत नाहीत?’ या परिसंवादात साहेबराव ठाणगे, सतीश सोळांकूरकर यांनी परखड मत व्यक्त केले. संमेलनाच्या तिसर्या सत्रात ’अनोखे कवी : अनोख्या कविता’ या शीर्षकांतर्गत मंगला पाटसकर, मानसी चिटणीस, उज्ज्वला केळकर, विनिता पिसाळ, कैलास भैरट यांनी कवीवर्य पु. शि. रेगे, वासंती मुझुमदार, कविता महाजन, अरूण कोलटकर, गुरूनाथ सामंत, सदानंद रेगे या कवींच्या कवितांचे अभिवाचन केले. ज्येष्ठ कवी नारायण लाळे, कृपेश महाजन, दिनेश भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या कवी संमेलनात तीस कवींनी कविता सादर केल्या.