जळगाव । महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा- चाळीसगावचे कार्यकारिणी सदस्य तथा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, पिंपरखेड तांडा, ता. चाळीसगाव येथील शिक्षक कवी मनोहर ना. आंधळे यांच्या ‘डोळ्यात कालचे पाणी’ या काव्यसंग्रहास एकदिवसीय तेराव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात राज्यस्तरीय वि.भा. नेमाडे, वाङमय पुरस्कार 2017 प्रदान करण्यात आला. संमेलनाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांचे हस्ते प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरुप-रोख रक्कम, सन्मानपत्र व मोतीमाळ असे असून, याप्रसंगी कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचेसह उद्घाटक कवी विश्वास वसेकर ठाणे, सेवादास दलुभाऊ जैन आणि ‘सूर्योदय मंडळाचे’ अध्यक्ष सतीश जैन विराजमान होते. ‘डोळ्यात कालचे पाणी’ या काव्यसंग्रहास हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. यापूर्वीच नागपूर येथील महाकवी सुधाकर गायधनी काव्यलेखन पुरस्कार: तर बडोदा येथील उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वाडीलाल राठोड, उपाध्यक्ष मच्छिंद्र राठोड, सचिव सुभाष गुलाबराव चव्हाण, प्राचार्य आर. बी. उगले, मुख्याध्यापक मधुकर बागुल यांचेसह महाराष्ट्र साहित्य परिषद, चाळीसगावचे अध्यक्ष -प्राचार्य तानसेन जगताप, उपाध्यक्षा – अॅड. सुषमा पाटील, कार्याध्यक्ष – विजय पाटील, प्रमुख कार्यवाह-गणेश आढाव, कोषाध्यक्ष- अण्णा धुमाळ आणि कवी बंधु प्रा. वा.ना. आंधळे तसेच जळगाव जिल्हा आश्रमशाळा परिवार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य तथा म.सा.प. सभासदांनी व जिल्ह्यातील अनेक साहित्यिक मित्रांनी कवी मनोहर आंधळे यांच्या अभिनंदन वर्षाव केलेला आहे.