कव्वालीपासून चित्रपट गीतांपर्यंतची अनोखी सफर

0

पुणे : ‘ख्वाजा मेरे ख्वाजा… संदे से आते है… लागा चुनरी मे दाग… आपकी नजरेनो समझा…’ यांसारख्या हिंदी चित्रपटातील नावाजलेल्या गीतांसह ‘निगाहे मिलानेको जी चाहता है…’सारख्या कव्वालीपर्यंत एकाहून एक सरस गाण्यांची ‘पेशकश गीतों का सफर’ या कार्यक्रमामध्ये झाली. प्रख्यात गझलकार व गायक रुपकुमार राठोड आणि सहकार्‍यांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताला भरभरून दाद देत रसिकांनी सुफी, हिंदी व मराठी संगीतातील अविष्कार अनुभविले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये रूपकुमार राठोड यांना त्यांच्या पत्नी गायिका सुनाली राठोड यांनी देखील सुरेल साथ दिली.

‘गणराज रंगी नाचतो… एकदंताय वक्रतुंडाय, धिमही… जीव रंगला…’ या मराठी गीतांसह संत ज्ञानेश्वर महाराजांचा ‘अवचिता परिमळू…’ या अभंगाला रसिकांची विशेष दाद मिळाली. ‘दुनिया जिसे केहेते है, जादू का खिलौना है…’ ही गझल, ‘ऐसा कोई जिंदगीसे वादा तो नहीं था…’, ‘तुही तो जन्नत मेरी…’ यांसारख्या हिंदी गीतांमध्ये सुरात सूर मिसळून रसिकांनी देखील मैफलीचा आनंद घेतला. तर, ‘मधुबन मे राधिका…’सारख्या अजरामर गीतांच्या सादरीकरणामध्ये तबल्याची सुरेल साथ गायकांना मिळाली.

गझल, हिंदी-मराठी चित्रपट गीते, कव्वाली आणि सुफी संगीताच्या सादरीकरणाने उत्तरोत्तर हा गीतों का सफर कार्यक्रम रंगत गेला. अझर हुसेन वारसी (किबोर्ड), सुशांत शर्मा (गिटार), राज सोढा (सॅक्सोफोन), अखलक हुसेन वारसी (हार्मोनियम), असरर अहमद (तबला), हर्ष नासेरी आदींनी साथसंगत केली.