राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर सरकार कसे टिकवायचे? देशातील कायम असलेली मोदी लाट लक्षात घेता मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे की नाही? याबाबत भारतीय जनता पक्षाचे धुरिण विचार करत असताना व त्यासाठी विविध सर्वेक्षणे घेत असताना, सत्तेतील पार्टनर शिवसेनेने पाठिंबा काढण्याची पुन्हा एकदा धमकी दिली आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने शेतकरी कर्जमाफी दिली नाही तर सत्तेतून बाहेर पडू; आमच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत, अशी वल्गना करणार्या शिवसेनेने पुन्हा एकदा आपले बोलघेवडेपण प्रदर्शित केले. सत्तेतून बाहेर पडण्याची शिवसेनेत धमक नाही, शिवसेना ही सत्तेच्या गुळाला चिकटलेला मुंगळा आहे, अशी सार्वत्रिक ओरड होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे असल्या पोकळ धमक्या देऊन स्वतःचे हसे का करून घेत आहेत, तेच कळत नाही. काल नाशिक येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी नवी गुगली टाकली. ते म्हणाले, शेतकर्यांना कर्जमुक्त न केल्यास आम्ही सत्तेतून बाहेर पडू व कर्जमुक्ती दिल्यास भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ. म्हणजेच काय? तर शिवसेना काहीच करणार नाही, असा त्याचा सरळसरळ अर्थ होतो. शेतकरीप्रश्नी शिवसेना इतकीच गंभीर असेल तर तातडीने त्यांनी सत्ता सोडायला हवी. राज्यात तूर खरेदीतील गैरप्रकार, शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी कर्जमाफी या प्रश्नांवरून भाजपविरोधात वातावरण पेटले आहे. त्या पेटत्या वातावरणात विरोधी पक्षाची संघर्ष यात्रा तेल ओतण्याचे काम करीत आहे. इतकेच काय भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी तमाम शेतकर्यांना शिवी हासडून पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यामुळे आठवडाभरात कर्जमाफी द्या, अन्यथा पाठिंबा काढून घेतो, असा अल्टिमेटम देऊन शिवसेना पक्षप्रमुखांनी या सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजेत. परंतु, तशी हिंमत शिवसेनेत नाही. कारण, त्यांना विरोध अन् सत्ता अशा दोन्ही बाबी सांभाळायच्या आहेत.
आपण सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकते, असे एक तर्कट शिवसेनेत नेहमीच मांडले जाते. शरद पवारांवर विश्वास ठेवू नका, असेही शिवसेना पक्षप्रमुखांना सांगितले जाते. परंतु, पवार जे बोलत नाहीत ते करतात, असा अनुभव पाहता ठाकरे यांची भीती अगदीच निरर्थक आहे. शिवसेनेने पाठिंबा काढला तर आम्ही शिवसेना किंवा भाजप असे कुणालाच पाठिंबा देणार नाही. राज्यात मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाऊ, असे स्वतः पवारांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे सरकार कोसळू शकते, हे अगदी उघड आहे. परंतु, सरकार कोसळले तर त्याचा ठपका शिवसेनेवर पडेल अन् लोकांच्यासमोर कोणत्या तोंडाने जायाचे, अशी भीती ठाकरे यांना वाटत असावी. त्यांच्या या भीतीवर त्यांनीच राजकीय तोडगा शोधला पाहिजेत. परंतु, असा तोडगा न शोधता निव्वळ आम्ही पाठिंबा काढून घेऊ, सत्तेला लाथ मारू, अशा निरर्थक डरकाळ्या फोडून काय हासील होणार आहे? उलटपक्षी शिवसेनेची प्रतिमा जनमानसात खराब होत असून, त्याचा राजकीय फटका शिवसेनेला बसत आहे.
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार कर्जमाफी का देत नाही? हा मोठाच प्रश्न आहे. राज्यासमोर आर्थिक समस्या आहेत, परंतु केंद्रातून पैसा आणण्यास फडणवीस अपयशी ठरत आहेत का? तसा त्यांचा आपल्याच सरकारमध्ये वट नाही का? अन् तेवढा वट नसेलच तर मग ते मुख्यमंत्रीपदावर थांबतातच कसे? याबाबत खुद्द फडणवीस यांनीच विचार करायला हवा. शेतकरी फार हलाखीचे जीणे जगत आहे. राज्यभर शेतकरी आत्महत्यांचा उद्रेक झालेला आहे. यापूर्वीच्या राष्ट्रवादी व काँग्रेस राजवटीच्या सरकारपेक्षाही जास्त शेतकरी आत्महत्या भाजप सरकारच्या काळात झाल्या आहेत अन् दररोज होत आहेत. भाजपची बांधिलकी शेतकरी अन् सर्वसामान्यांशी नाही का? असेल तर मग् निर्णय का होत नाहीत? यंदा तुरीचे बंपर पीक होणार आहे, याचा अंदाज सरकारला आला होता.
तरीदेखील तूरडाळ आयात करण्याचा निर्णय कसा झाला? त्यामुळे तूरखरेदीचा मोठा प्रश्न सरकारपुढे उभा ठाकला आहे. तूरखरेदीतही मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस येत आहेत. म्हणजेच, शेतकरीप्रश्नी या सरकारचे काहीच धोरण नाही का? अशा काही प्रश्नांवर विचार करण्यास हे सरकार तयार नाही. मग् शेतकर्यांचे प्रश्न सुटतील कसे? जी बाब शेतकरीवर्गाची तीच बाब राज्यातील नोकरदारांचीदेखील आहे. इतर राज्यांत सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. राज्य सरकार मात्र त्याबाबत मूग गिळून गप्प बसले आहे. राज्य सरकारी कर्मचारीवर्गास सातव्या वेतन आयोगाचे लाभ हे द्यावेच लागणार आहेत. त्यासाठी समीक्षण समिती गठीत करण्याव्यतिरिक्त काहीही हालचाली सरकारने केल्या नाहीत. शेतकरी, नोकरदार, व्यापारी व मध्यमवर्गीय असे कुणीच जर तुमच्या राज्यात समाधानी नसतील तर तुमचे राज्य चालवले जाते तरी कुणासाठी? हा प्रश्न फडणवीस सरकारला विचारावा लागणार आहे. विरोधक ज्या प्रश्नांवर आवाज उठवतात, तेच मुद्दे शिवसेना हाती घेते. सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका वठवण्याचे काम शिवसेना करत आहे. त्यांचा हा दुटप्पीपणा विरोधकांच्या मुळावर उठला आहे. कारण, त्यामुळे होते काय की, त्या प्रश्नाचे गांभीर्य नष्ट होते. शेतकरी आत्महत्या का करत आहेत, कारण त्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडे धोरण नाही. कर्जमाफी हा त्या प्रश्नावरील रामबाण उपाय आहे. त्यामुळे कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यासाठी राज्यभरात ते संघर्षयात्रा काढत आहेत. परंतु, या संघर्षयात्रेची धार बोथट करणे आणि कर्जमाफीच्या मुद्द्याचे गांभीर्य कमी करणे यासाठीच शिवसेनेने या मुद्द्यावर आपल्याच सरकारवर टीका सुरू केली आहे. काल नाशकात उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले ते पाहता, ठाकरे हे विरोधकांचीच नक्कल करत असल्याचे दिसते. इतकाच शेतकरीप्रश्नी कळवळा असेल तर खरोखर सत्तेवर लाथ मारा अन् मैदानात उतरून संघर्ष सुरू करा ना! त्यासाठी अडविले कुणी? परंतु, सत्तेची गोड फळेही चाखायची अन् सरकारवर टीकाही करायची, हे प्रकार आता ठाकरे यांनी बंद करायला हवेत. शिवसेना सत्ता सोडू शकत नाही, हे सगळ्यांना कळून चुकले आहे. परंतु, विरोधकांच्या विरोधाच्या संवेदना बोथट करण्यासाठीच ते सरकारवर टीका करतात हेदेखील प्रत्येकाच्या लक्षात आले आहे. महापालिका निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडलेत, वाट्टेल ती टीका केली. आरोप-प्रत्यारोप झालेत. शेवटी झाले काय? मुंबई महापालिका शिवसेनेला दिल्यानंतर उर्वरित राज्य त्यांनी भाजपला आंदण दिले. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो, असे ढोंग किती काळ वठवणार आहात? अन् हे ढोंग लोकांच्या लक्षात येत नाही, असे उगीच ठाकरे यांना वाटत आहे. किमानपक्षी शेतकरीप्रश्नी तरी अशा ढोंगाची ठाकरे यांच्याकडून अपेक्षा नाही. राज्यातील अनेक प्रश्न गंभीर आहेत. ते सरकारमध्ये राहून सोडवता येत नसतील तर उद्धव ठाकरे यांनी खुशाल सरकारमधून बाहेर पडावे. त्यासाठी भाजपच्या धूर्त राजकीय खेळींना बळी पडू नये.
नारायण राणे यांचा बागुलबुवा खरे तर शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडू नये, यासाठीच उभा करण्यात आला आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर शिवसेना व काँग्रेसचे आमदार फोडून राणे भाजपात येतील व सरकार वाचवतील, अशी एक हवा राज्यात निर्माण करण्यात आली आहे. त्यात काहीही तथ्य नाही. राणे हे भाजप समजते इतके सोपे नाहीत आणि राणेंना सोपे घेण्याइतपत भाजपची तयारी कधीच नसेल. त्यामुळे शेतकरीप्रश्नी खरोखर गंभीर असाल, तर नुसती वायफळ बडबड करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी सत्तेला लाथ मारून दाखवावी. राज्यातील तमाम शेतकरीवर्ग तुम्हाला डोक्यावर घेईल!
पुरुषोत्तम सांगळे – 8087861982