कश्यपने अग्रमानांकित ली ह्युनला चकवले

0

अनाहिम । राष्ट्रकुल विजेता पारुपल्ली कश्यपने अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्याच फेरीत खळबळजनक विजय मिळवताना अग्रमानांकित कोरियाच्या ली ह्युनला स्पर्धेतील गाशा गुंडाळायला लावला. अन्य लढतीत दुसरे मानांकन मिळालेल्या एच. एस. प्रणॉय, पाचवा मानांकित असलेल्या समीर रेड्डी या भारतीय खेळाडूनी पुरुषांच्या एकेरी लढतीच्या दुसर्‍या फेरीत स्थान मिळवले.खांद्याच्या दुखापतीतून सावरलेल्या कश्यपने चिवट झुंज देत एक तास 3 मिनीटे रंगलेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेल लीचा 21-16, 10-21, 21-19 असा पराभव केला.

कश्यपचा सामना हंगेरीच्या गेर्गली क्राउझशी
अन्य लढतींमध्ये समीरने सकारात्मक सुरुवात करताना व्हिएतनाम होअंग नाम नगुयेनवर 21-5, 21-10 असा सहज विजय मिळवला. प्रणॉयने ऑस्ट्रेलियाच्या लुका वर्बरवर 21-12, 21-16 अशी सरशी मिळवली. तर हर्षील दाणीने मेक्सिकोच्या अर्तुरो हर्नडेंसचा 21-13, 21-9 असा पराभव केला. पुढील लढतीत कश्यपचा सामना हंगेरीच्या गेर्गली क्राउझशी होईल. माजी राष्ट्रीय विजेत्या समीरसमोर क्रोशियाच्या झ्वोनिमीर दुर्काजंकचे आव्हान असेल. प्रणॉयचा सामना आयर्लंडच्या जोशुआ मगी आणि दाणीची लढत व्हिएतनामच्या तिएन मिन्ह नगुयेनशी होईल.भारताच्या रितुपर्ण दासने कॅनडाच्या रॅचेल होंडेरचीचा 21-16, 21-18 असा पराभव केला. कृष्णप्रिया कद्रवल्लीने दुसर्‍या फेरीत स्थान मिळवताना यजमानांच्या माया चेनवर 21-13, 21-16 असा विजय मिळवला. अन्य लढतींमध्ये सारंग लखानी, अभिषेक येलेगर, साई उत्तेजीथा राव चुक्का, रेश्मा कार्तिक आणि रुत्विका शिवानी गड्डेचे आव्हान पहिल्याच फेरीतच संपुष्टात आले.