कश्यपला हरवून प्रणॉयने रचला इतिहास

0

कॅलिफोर्निया । जागतिक क्रमवारीत 23 व्या क्रमांकावर असलेल्या एच. एस. प्रणॉयने अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत सहकारी खेळाडू पारुपली कश्यपचा पराभव करत कारकिर्दीतले तिसरे ग्रापी गोल्ड विजेतेपद मिळवले. या विजयामुळे अमेरिकन ओपन ग्रापी जिंकणारा प्रणॉय पहिला बॅडमिंटनपटू ठरला आहे. याआधी कुठल्याही भारतीय बॅडमिंटनपटूला ही स्पर्धा जिंकता आली नव्हती. हा सामना प्रणॉयने चिवट झुंजीनंतर 21-15, 20-22, 21-12 असा जिंकला.

पहिल्या गेममध्ये सुरुवातीला प्रणॉय 4-8 असा पिछाडीवर पडला होता. पण त्यानंतर प्रणॉयने स्वत:ला सावरत पहिल्या गेममध्ये 21-15 अशी सरशी मिळवली. दुसर्‍या गेममध्ये मात्र कश्यपने जोरदार खेळ केला. या गेममध्ये कश्यपच्या आक्रमक फटक्यांसमोर प्रणॉय काहीसा हतबल झालेला दिसत होता.

तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये मात्र प्रणॉयने कश्यपला आघाडी घेण्याची संधी मिळू दिली नाही. या गेममध्ये पुन्हा आक्रमक खेळ करत 21-12 अशा फरकासह प्रणॉयने गेम आणि सामनाही खिशात घातला. प्रणॉय आणि कश्यपने दोन वेळा समोरासमोर उभे ठाकले होते. या दोघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता.